esakal | भाजपमधून राष्ट्रवादीत येऊन कोतकर सभापती; महाविकास आघाडी धर्म पाळत शिवसेनेची माघार
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Kotkar as the Chairman of the Standing Committee of the Municipal Corporation

अहमदनगर महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणुकीत आणखी "क्‍लायमेक्‍स' पहायला मिळाला.

भाजपमधून राष्ट्रवादीत येऊन कोतकर सभापती; महाविकास आघाडी धर्म पाळत शिवसेनेची माघार

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : अहमदनगर महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणुकीत आणखी "क्‍लायमेक्‍स' पहायला मिळाला. दुरंगी लढत वाटत असतानाच शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी वरिष्ठांच्या आज्ञेनुसार महाआघाडीचा धर्म पाळत निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपमधून कालच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले मनोज कोतकर स्थायी समितीचे बिनविरोध सभापती झाले आहेत.

महापालिकेत सध्या भाजपचा महापौर असला, तरी त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाठबळ आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. काल स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना ऐनवेळी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला.

त्यामुळे ते राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवाराला शिवसेनेला महाविकास आघाडीचा धर्म पाळावा लागणार अशी आमदार संग्राम जगताप यांनी खेळी खेळली. या खेळीमुळे शिवसेना उमेदवार योगीराज गाडे यांनी वरिष्ठांच्या आज्ञेनुसार महाविकास आघाडी धर्माचे पालन करत माघार घेतली. माघारीचा मेल गाडे यांनी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पाठविला. हा मेल मिळाल्याने जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. त्यानुसार मनोज कोतकर हे बिनविरोध स्थायी समितीचे सभापती झाले आहेत.
मनोज कोतकर भाजपमध्ये होते, तरी ते आमदार जगताप यांचेच कार्यकर्ते मानले जात होते.

महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी मनोज कोतकर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. सत्तेच्या राजकारणात ते भाजपमध्ये गेले. तेथून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. असे असले, तरी ते जगताप यांचेच कार्यकर्ते म्हणून मानले जात होते. सध्या स्थायी समितीचे 16 सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 5, शिवसेना 5 , कॉंग्रेस 1 आणि बहुजन समाज पक्ष 1 असे बलाबल आहे. मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत जाऊन ते त्यांना आता राष्ट्रवादीचे हक्काचे 5 मते मिळविली होती. तसेच भाजपला यापूर्वी राष्ट्रवादीनेच पाठिंबा दिला असल्याने साहजिकच भाजपचेही काही मते त्यांना मिळण्याची शक्‍यता होती. मात्र निवडणूक बिनविरोध झाल्याने ऑनलाईन मतदानाची वेळच आली नाही.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांबरोबरच शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे दक्षिण विभाग प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर