नगर जिल्हा विभाजनाची सूत्र हलली थेट अमेरिकेतून

गौरव साळुंके
Tuesday, 20 October 2020

लवकरच समितीची पुढील बैठक होणार आहे. आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवक व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत.

श्रीरामपूर ः निवडणुका आल्या की नगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या चर्चा झडतात. मध्यंतरी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांनी ती चर्चा घडवून आणली होती. त्यापूर्वी बबनराव पाचपुते या विषयाच्या मागे लागले होते. निवडणुका संपल्या हा विषय गुंडाळला जातो.

सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने नवीन काहीच घडत नाही. परंतु श्रीरामपूरकरांनी हा मुद्दा लावून धरला आहे. श्रीराममपूर जिल्हा निर्मितीचा लढा सुरूच आहे. श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी मुंबई-पुण्यातून नव्हे तर थेट अमेरिकेतून सूत्र हलत आहेत.

आगामी प्रजासत्ताक दिनापासून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. कोरोनाचे संकट गेल्यावर श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या चळवळीला नव्याने चालना देण्यासाठी आॅनलाईन बैठक घेण्यात आली. या वेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रताप भोसले यांनीे थेट अमेरिकेतून बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.

समितीचे पदाधिकारी, सदस्य विविध ठिकाणाहून बैठकीत सहभागी झाले होते. समितीचे अध्यक्ष बाबासाहेब औताडे, सुनंदा आदिक, सुरेश ताके, शरद डोळसे उपस्थित होते.

जिल्हा विभाजन, नवीन जिल्हा निर्मितीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला आहे. त्याचा मंत्रालयीन पातळीवर श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने पाठपुरावा करावा, अशी सूचना मिलिंद साळवे यांनी केली.

समितीच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या राजकीय पोस्ट्सवर नाराजी व्यक्त करीत यापुढे अशा पोस्टस् टाळून सदस्यांनी समितीच्या मंचावर जिल्हा निर्मिती कार्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची अपेक्षा प्रताप भोसले यांनी व्यक्त केली.

लवकरच समितीची पुढील बैठक होणार आहे. आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवक व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत.

आंदोलनाच्या दृष्टीने काही ठोस सूचना समितीच्या विचाराधीन आणाव्यात असे तिलक डुंगरवाल, शरद डोळसे यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांचा श्रीरामपूर जिल्हा निर्मिती चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वाच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी डोळसे, ताके यांच्यावर सोपविली आहे.

प्रजासत्ताक दिनापासून समितीचे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका घेतल्याचे ताके यांनी सांगितले. उपस्थित सर्व सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले. बैठकीत सुनंदा आदिक यांनी विविध सुचना केल्या. तर समन्वयक क्षितिज सुतालने यांनी सूत्रसंचालन केले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting for formation of Shrirampur district