संचारबंदीमुळे मीडनाईट सर्व्हिसचा कार्यक्रम होणार रद्द

अमित आवारी
Tuesday, 22 December 2020

नगर शहर हे महाराष्ट्रातील जेरूसलेम समजले जाते. शहरासह जिल्ह्यात मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाज राहतो. दिवाळीनंतर राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

नगर ः कोरोनाच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका हद्दीत रात्री 11 ते सकाळी सहा, या वेळेत संचारबंदी जाहीर केली आहे. हा आदेश 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. या कालावधीत नाताळ सण आल्याने ख्रिस्ती समाजाचा गुरुवारी (ता. 24) होणारा मिडनाईट सर्व्हिस कार्यक्रम रद्द होण्याची शक्‍यता आहे. 

नगर शहर हे महाराष्ट्रातील जेरूसलेम समजले जाते. शहरासह जिल्ह्यात मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाज राहतो. दिवाळीनंतर राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, प्रार्थनास्थळांत सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रार्थनास्थळे खुली झाल्याने ख्रिस्ती समाजास यंदा चर्चमध्ये नाताळ सण साजरा करता येईल, याचा आनंद झाला. त्यानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने चर्च सजले आहेत. 

हेही वाचा - भाजपला जबर हादरा, दोन मातब्बर नेते गेले काँग्रेसमध्ये

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशामुळे शहरातील ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणातील सुरवातीचा मिडनाईट सर्व्हिस कार्यक्रम रद्द करावा लागणार आहे. शिवाय नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांतही गर्दी करता येणार नाही. शिवाय उपस्थितांना सोशल डिस्टन्सचे पालन करावे लागणार आहे. 

काय असते मिडनाईट सर्व्हिस? 
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म 25 डिसेंबरला मध्यरात्री झाला. त्यामुळे 24 डिसेंबरला रात्री चर्चमध्ये प्रार्थना व ख्रिस्त गीते सादर होतात. मध्यरात्री 12 वाजता चर्चवरील घंटानाद केला जातो. ख्रिस्ती बांधव एकमेकांना ख्रिस्त जन्माच्या शुभेच्छा देतात. या कार्यक्रमाला मिडनाईट सर्व्हिस, असे म्हणतात. यंदा रात्री 11 वाजेनंतर संचारबंदी असल्याने हा कार्यक्रम होण्याची शक्‍यता कमी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Midnight service canceled due to curfew