घरकुलाच्या बांधकामातील अडथळा मंत्री तनपुरेंमुळे झाला दूर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

"राहुरीच्या वाढीव पाणी योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिल्याचे पत्र देऊन, आभास निर्माण केला. प्रत्यक्षात नगर विकास राज्यमंत्रीपद मिळाल्यावर योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली.

राहुरी : "राहुरी नगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मंजूर घरकुलांच्या लाभार्थ्यांची आर्थिक अडचण दूर झाली. ग्रीनझोनमधील लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणही दूर झाली आहे.

राहुरी पालिकेने जिल्ह्यात सर्वप्रथम योजना राबविण्यास सुरुवात केली. कामही सर्वप्रथम करावे. शहराच्या विकासासाठी वर्षभरात दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे." असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

आज (शुक्रवारी) राहुरी येथे घरकुलाच्या पहिल्या टप्प्यातील 233 व दुसऱ्या टप्प्यातील 460 लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारचे 6 कोटी 82 लाख रुपये अनुदान वितरणप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते.

अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिता पोपळघट होत्या. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, दिलीप चौधरी, प्रकाश भुजाडी, अशोक आहेर, विलास तनपुरे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, शिवाजी डौले, दशरथ पोपळघट उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, "घरकुलाचे अनुदानात दीड वर्षापासून रखडले होते. म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन, राज्य सरकारचे अनुदान वर्ग केले. नगराध्यक्षपदाच्या काळात तीन वर्षात निधीअभावी विकास कामांना ब्रेक लागला होता. आता गती मिळेल. जोगेश्वरी आखाडा येथे स्मशानभूमीच्या विकासासाठी 33 लाख, जॉगिंग ट्रॅक साठी दीड कोटी निधी मंजूर केला आहे.

"राहुरीच्या वाढीव पाणी योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिल्याचे पत्र देऊन, आभास निर्माण केला. प्रत्यक्षात नगर विकास राज्यमंत्रीपद मिळाल्यावर योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली. लवकरच कामाची निविदा काढली जाईल. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार मदत करणार आहे." असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे घरांची पडझड, जळीतग्रस्त 24 कुटुंबांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. सूर्यकांत भुजाडी यांनी आभार मानले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Tanpur removed the obstacle in the construction of the house