आमदार राजळे यांनी घरी जाऊन केले मदतीच्या धनादेशांचे वितरण

राजेंद्र सावंत
Tuesday, 27 October 2020

केळवंडी येथील सक्षम आठरे व मढी येथील श्रेया सूरज साळवे यांचा बिबट्याने घेतलेल्या बळींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखाच्या मदतीचे धनादेश आमदार मोनिका राजळे व जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी संबंधितांच्या घरी जाऊन दिले.

पाथर्डी (अहमदनगर) : केळवंडी येथील सक्षम आठरे व मढी येथील श्रेया सूरज साळवे यांचा बिबट्याने घेतलेल्या बळींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखाच्या मदतीचे धनादेश आमदार मोनिका राजळे व जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी संबंधितांच्या घरी जाऊन दिले.

तालुक्‍यातील केळवंडी येथे बिबट्याने सक्षम आठरे यांच्यावर हल्ला केल्यानंतरही दोन वेळा नागरिकांना दर्शन दिल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. रांजणी येथील बाबासाहेब घोडके यांची शेळी बिबट्याने मारल्याने रांजणी गावातही नागरिक भीतीच्या छायेत आहेत.

आमदार मोनिका राजळे, जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहायक उपवनसंरक्षक एस. आर. पाटील व किशोर सोनवणे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे, जिल्हा परिषद सदस्य संध्या आठरे, उपसभापती मनीषा वायकर, बबन मरकड, रवींद्र आरोळे, प्रदीप आठरे यांच्या उपस्थितीत मढी येथील श्रेया सूरज साळवे यांच्या वारसाला पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर केळवंडी येथे सक्षम गणेश आठरे यांच्या कुटुंबालाही पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. केळवंडी गावात शनिवारी रात्री बिबट्याने हल्ला करून सक्षम आठरे यांना उचलून नेले. सुमारे चार तास बिबट्या तेथेच होता. सकाळी ग्रामस्थ व वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या डोंगराच्या दिशेने पळाला.

रस्त्यालगत रात्री अकरा वाजता बिबट्याला रहिवाशांनी पाहिले. रांजणी येथील बाबासाहेब घोडके यांची शेळी बिबट्याने खाल्ली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कळविण्यात आले. त्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी पोचले. वन विभागाने सहा पिंजरे आणले आहेत. केळवंडी, रांजणी, चेकेवाडी ते धनगरवाडी परिसरात ते लावले जातील. नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र काळजी घ्यावी. एकाच वेळी चार ठिकाणी बिबट्या व त्याचे ठसे पाहिल्याने, त्यांची संख्या चार असावी, असा अंदाज आहे. आम्ही त्यांना पकडण्यासाठी रात्रंदिवस काम करू, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Monika Rajale went home and distributed aid checks