राष्ट्रवादीला रोखण्यासाठी विखेंना मंत्रिपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Radhakrishna Vikhe Patil got ministerial opportunity fadanvis chandrakant patil politics

राष्ट्रवादीला रोखण्यासाठी विखेंना मंत्रिपद

शिर्डी : भाजपच्या गोटातील शुगर लॉबीतील एक दिग्गज नेते म्हणून आज (मंगळवारी) आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना अपेक्षेनुसार मंत्रिपदाची संधी मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे स्नेहसंबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या प्रभावाला शह देण्याची क्षमता असलेला एकमेव नेता म्हणून त्यांच्या नावाला भाजपसमोर दुसरा पर्यायदेखील नव्हता. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे झालेल्या पहिल्या सहकार परिषदेचे यशस्वी आयोजन त्यांच्या कामी आले.

मागील लोकसभा निवडणुकीत विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय हे भाजपच्या तिकिटावर खासदार झाले. काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते असलेले विखे पाटील भाजपवासी झाले. फडणीस यांच्यासोबतच्या मैत्रीची किनार या सर्व राजकीय घडामोडींना आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विखे पाटील भाजपमध्ये गेले. मात्र, त्यावेळी कामगिरी सुधारण्याऐवजी भाजपचे बळ घटले. जे उमेदवार पराभूत झाले, त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत तक्रारी केल्या. मात्र, त्याचा परिणाम फडणवीस यांच्यासोबतच्या मैत्रीवर आणि परस्परविश्वासावर झाला नाही. राजकारणात शेवटी शक्तीची पूजा होते. जिल्हाभर स्वतःची यंत्रणा असलेले ते एकमेव नेते आहेत. त्यांचे राजकीय स्थान हीदेखील एक जमेची बाजू आहे.

भाजपच्या दृष्टीने आगामी लोकसभा निवडणूक फार महत्त्वाची आहे. भाजपने त्यासाठी जोरदार तयारीदेखील सुरू केली आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकायच्या असतील, तर विखे पाटील यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यातून दुसरे नाव पुढे येणे शक्य नव्हते. तथापि, भाजपचे धक्कातंत्र लक्षात घेता, शपथविधी होईपर्यंत काय होईल, याबाबत त्यांच्या हितचिंतकांच्या मनातही धाकधूक होती. केंद्रातले मोदी सरकार सहकार क्षेत्रातील ठरावीक कुटुंबांची व महाराष्ट्रात त्यावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी मोडू इच्छिते. या पार्श्वभूमीवर या खात्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत

प्रवरानगर येथे पहिली सहकार परिषद विखे पाटील यांनी यशस्वी करून दाखविली. त्यातून त्यांना पक्षश्रेष्ठींच्या गुड बुकमध्ये जाण्याची संधी मिळाली. अलीकडे ते पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमांतदेखील सातत्याने सक्रिय राहिले.

पक्ष वाढविण्याची जबाबदारी

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पुन्हा वाढला. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादी आणि सहकारातील भाजपसह अन्य नेत्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व कायम ठेवतात. आता विखे पाटील मंत्री झालेत आणि थोरात विरोधी पक्षाचे आमदार आहेत. मंत्रिपद मिळाल्याने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत भाजपचे बळ वाढविण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल. ती क्षमता त्यांच्यात आहे.