आमदार जगतापांचे अद्ययावत शासकीय ग्रंथालय उभारण्याचे अश्‍वासन 

अमित आवारी
Monday, 30 November 2020

नगर शहराला वैभवशाली साहित्य, कला व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे.

अहमदनगर (अहमदनगर) : नगर शहराला वैभवशाली साहित्य, कला व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. वाचन हा या परंपरेचा पाया असून, शहरात वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी, युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शहरात अद्ययावत शासकीय ग्रंथालय उभारणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. 

राज्य सरकारचे ग्रंथालय संचलनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्‌घाटन जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापालिका स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक गणेश भोसले, अजिंक्‍य बोरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, रामदास शिंदे, हनुमान ढाकणे, संदीप नन्नवरे आदी उपस्थित होते. 

जगताप म्हणाले, की दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी मेजवानी आहे. दिवाळी अंकांच्या माध्यमातून विविध विषय मांडले जातात. ग्रंथालय चळवळ व्यापक होण्यासाठी ग्रंथालय व वाचनसंस्कृती टिकविणे गरजेचे आहे. नवीन ग्रंथालये उभारण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर म्हणाले, की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रंथालये आहेत. वाचनसंस्कृती वाढण्यासाठी आणखी ग्रंथालये उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sangram Jagtap promise to set up an up to date government library