नवरात्रौत्सवात राशीनमध्ये मोहट्याचीच कार्यपद्धती

दत्ता उकिरडे
Saturday, 17 October 2020

घटस्थापनेच्या पूजेसाठी मंदिरात कोणाला प्रवेश देण्यात येतो यासाठी मंदिरासमोर आज वरील चौघांसह सेवेकरी, भाविक आणि पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक सुरेश माने हे आपल्या फौजफाटयासह प्रवेशद्वारावर सज्ज होते.

राशीन : राशीनचा नवरात्रोत्सव साजरा करण्यात सर्व जातीधर्माच्या मंडळीचा सहभाग असल्यामुळे यमाई मंदिरात केवळ ठराविक प्रतिष्ठितांनाच प्रवेश दिल्यास राशीनमध्ये गोंधळाची व असंतोषाची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे प्रशासनाने मोहटादेवी मंदिरात वापरलेली कार्यपध्दती वापरून प्रशासनाने निर्णायक भूमिका घ्यावी, असे आवाहन श्‍याम कानगुडे, विक्रम राजेभोसले, तात्यासाहेब माने, मालोजी भिताडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे शुक्रवारी (ता.16) निवेदनाद्वारे केल्याने आज घटस्थापनेच्या पूजेला पोलिस बंदोबस्तात केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला. 

घटस्थापनेच्या पूजेसाठी मंदिरात कोणाला प्रवेश देण्यात येतो यासाठी मंदिरासमोर आज वरील चौघांसह सेवेकरी, भाविक आणि पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक सुरेश माने हे आपल्या फौजफाटयासह प्रवेशद्वारावर सज्ज होते.

यावेळी उपस्थितांनी प्रवेश दिला तर परंपरेनुसार सर्वांनाच द्या दुजाभाव करू नका अशी भूमिका घेतल्यानंतर शेवटी दोन पुजारी, शेटे कुटूंबातील एक सदस्य आणि ग्रामजोशी यांना मंदिरात घटस्थापनेसाठी जाऊ देण्यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानंतर दुपारी आज घटस्थापना करण्यात आली.

यमाई मंदिरात कोणाला प्रवेश मिळणार, कोण वंचित राहणार, प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, मंदिर प्रवेशावरून वादंग वाढणार का, याकडे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रशासनाने योग्य भूमिका घेतल्याने निवेदनकर्त्या कार्यकर्त्यांसह भाविकांनीही समाधान व्यक्त करीत या निर्णयाचे कौतुक केले. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohatya's procedure in Rasheen during Navratri