श्रीगोंद्यात मोटारसायकल चोरीचे रॅकेट, पोलिसांचा कानाडोळा

संजय आ. काटे
Friday, 8 January 2021

रात्रीच्या दुचाकी चोरताना आता दिवसाही चालता चालता चोरीचे प्रकार घडले आहेत. 

श्रीगोंदे : तालुक्यात दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्वाच्या गावांत दुकानांसमोर रस्त्याच्या दुतर्फा दुचाकींच्या रांगाच रांगा असतात.

गेल्या काही वर्षात दुचाकी चोरीचे रॅकेट तयार झाले असून दोन वर्षात शेकडो दुचाकींची चोरी झाली आहे. अर्थात यातील काहीच गुन्हे पोलिसांत दाखल झाले असले तरी प्रत्यक्षात दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक आहे. त्यातच पोलिसांची यंत्रणा याबाबतील कुचकामी ठरत असून कागदावर आखलेली कृती प्रत्यक्षात उतरत नसल्याने या चोरीत वाढ होत आहे. 

तालुक्यातून गेल्या काही वर्षांत दुचाकींच्या खरेदीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मजूरापासून तर महाविद्यालयान मुलांपर्यंत आता दुचाकी आवश्यक बनली आहे. शेतातील वीजपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्याला आता दुचाकीच लागते. त्यामुळे गावातील रस्ते दुतर्फा दुचाकींच्या गर्दीत दिसतात. त्यामुळे भुरट्या चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा या दुचाकींची चोरी करण्याकडे वळविला आहे. 

हेही वाचा - नगरचा लष्करी तळ हलविण्याच्या हालचाली

रात्रीच्या दुचाकी चोरताना आता दिवसाही चालता चालता चोरीचे प्रकार घडले आहेत. श्रीगोंदे व बेलवंडी पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनूसार गेल्या दोन वर्षात 170 दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून त्यातील केवळ बारा वहाने सापडली आहेत.

दरम्यान ज्यांच्याकडे नव्या अथवा वीमा उतरविलेल्या दुचाकी आहेत व त्यांची चोरी झाली तरच पोलिसांकडे धाव घेतली जाते. याव्यतिरिक्त दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होत नाहीत. त्यामुळे जुन्या दुचाकी चोरीवर चोरांची नजर राहते. 

समजलेल्या माहितीनूसार, चोरलेल्या दुचाकींचे पार्ट वेगळे करून त्याची विल्हेवाट लावली जाते. कर्जत, श्रीरामपूर, पुणे या ठिकाणी चोरीच्या दुचाकी अथवा त्यांचे पार्ट विकले जातात. 

श्रीगोंदे शहर व काष्टी गाव या चोरांनी लक्ष्य केले आहे. तेथील दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही बिनधास्त चोरी होते. काष्टीत मध्यंतरी एका चोराला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आला. पोलिसांची दुचाकी चोरांबद्दलची यंत्रणा कुचकामी आहे अथवा पोलिस त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे या चोरांचे फावते आहे. 

क्रमांक नसलेल्या दुचाकींवर कारवाई नाही
तालुक्यात अनेक दुचाकी क्रमांक नसलेल्या आहेत. काही दुचाकींवर पोलिस, प्रेस असे लिहिले असून यातील कुठल्याही वाहनांची चौकशी केली जात नाही. या बिनधास्त वावरामुळे चोरांना पोलिसांची भिती नसल्याचे वास्तव आहे. 

दुचाकी चोरीबाबत नव्याने आढावा घेत आहे. महत्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू. नागरीकांनी सहकार्य केल्यास काही दिवसांत या चोरीला आळा बसेल. 
-रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक श्रीगोंदे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Motorcycle theft racket uncovered in Shrigonda