
पैशात अडकलेल्यांनी फक्त गप्पा मारल्या
संगमनेर - आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे डोंगर उभे करणाऱ्या मंत्र्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते. वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारल्या पण सर्वसामान्य माणसाला काय दिले, याचा हिशोब भविष्यात होणार आहे. वाळू माफीया आणि बदल्यांचे रॅकेट खुलेआम कार्यरत होते, अशी टिका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली. तालुक्यातील निमगावजाळी, चिंचपूर, सादतपूर या गावांमध्ये केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थ्यांना साधन साहीत्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
विखे म्हणाले की, कोविड संकटात पंतप्रधानांनी देशातील जनतेसह महाराष्ट्राला दिलासा दिला. ज्येष्ठ नागरीकांसाठी वयोश्री योजना सुरू करून केंद्र सरकारने आपले सामाजिक दायित्व निभावले. राज्यात मागील अडीच वर्षात आघाडी सरकारच्या काळात फक्त भ्रष्टाचार बोकाळला. यातून मिळालेला पैसाच सहकारी संस्थांच्या निवडणुकात वापरला गेला. पैशाच्या जीवावर राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. भविष्यात जनता याचा हिशोब करणार आहे. केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असून, राज्यातही आता शिंदे -फडणवीस सरकार सतेवर आल्याने पुन्हा नव्याने विकासाची प्रक्रीया सुरू होईल.
यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे, शांताराम जोरी, अॅड. रोहीणी निघुते, दिपाली डेंगळे, सुजाता थेटे, गुलाबराव सांगळे, प्रवरा बँकेचे चेअरमन अशोक म्हसे, गिताराम तांबे, अमोल थेटे, रामप्रसाद मगर उपस्थित होते.