विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू, गावकऱ्यांचा नगरमध्ये ठिय्या

दत्ता इंगळे
Thursday, 17 December 2020

कार्ले, हराळ यांच्या नेतृत्त्वाखाली बहिरट यांच्या नातेवाईकांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रुपेशचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

नगर तालुका ः महावितरण प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे एकाच महिन्यात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बळी गेला. विजेचा धक्का बसून, आज बाबुर्डी बेंद येथे रुपेश सुखदेव बहिरट (वय 28) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर बहिरट यांचा मृतदेह आणून आंदोलन केले. 

जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, रेवण चोभे, दिलीप भालसिंग, वाळकीचे सरपंच शरद बोठे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचा - एकदाच करायची लागवड, नंतर पैसाच पैसा

महावितरण विभागाचे कंत्राटी कर्मचारी म्हणून रुपेश बहिरट हे खडकी येथे नियुक्‍तीस होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार, बाबुर्डी बेंद येथे वीजवाहक तारांच्या कामासाठी आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ते खांबावर चढले. मात्र, तारांमधून वीजप्रवाह सुरूच असल्याने विजेचा धक्‍का बसून ते खाली कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी करण्यात आली. 

कार्ले, हराळ यांच्या नेतृत्त्वाखाली बहिरट यांच्या नातेवाईकांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रुपेशचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. घटनेचा धक्का बसल्याने रुपेशच्या आईला खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले. 

महिन्यात दुसरी घटना 
दरम्यान, गेल्या महिन्यात दहिगाव (ता. नगर) येथेही महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला होता. एकाचे महिन्यात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आंदोलकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. 

खडकी येथील कंत्राटी कर्मचाऱ्यास बाबुर्डी बेंद येथील कामासाठी कसे बोलाविले? विद्युत खांबावर काम महावितरण कर्मचारी करतात. त्यांच्या मदतीसाठी कंत्राटी कर्मचारी असतो. असे असताना, अधिकाऱ्यांनी रुपेश बहिरट यांना हे काम कसे दिले, याची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी. 
- संदेश कार्ले, सदस्य, जिल्हा परिषद , अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL employee dies due to electric shock