पिंपरी चिंचवडच्या हॉस्पिटलला नगर महापालिकेचा ठेका, एमआरआयसाठी घाट्याचा सौदा

अमित आवारी
Saturday, 7 November 2020

एमआरआय मशीनसाठी जिल्हा नियोजन समितीतून साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला. महापालिकेने 9 महिन्यांपूर्वी मशीन खरेदी केले.

नगर ः महापालिकेने अत्यल्प दरात नागरिकांना एमआरआय सेवा मिळावी, यासाठी घाट्याचा सौदा केला आहे. एमआरआय मशीन चालविण्यासाठी महापालिकेकडे तज्ज्ञ कर्मचारी नाहीत. त्यामुळे महापालिकेने या कामाचा ठेका पिंपरी-चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्सला ठेका देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला आहे.

ठेकेदाराला वीज, पाणी फुकट देताना वर्षाला केवळ एक रुपया भाडे घेतले जाणार आहे. ठेकेदार संस्था महापालिकेला नफ्यातील केवळ पाच टक्‍के रक्कम देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे ठेवला आहे. 

तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या प्रयत्नामुळे एमआरआय मशीनसाठी जिल्हा नियोजन समितीतून साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला. महापालिकेने 9 महिन्यांपूर्वी मशीन खरेदी केले. मात्र, महापालिकेजवळ जागा व तज्ज्ञ कर्मचारी नसल्याने ते तसेच पडून होते.

महापालिकेच्या सावेडीतील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटच्या आवारात ऊन, वारा, पाऊस व धुळीचा मारा ते सहन करीत आहे. याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोरोटे, माजी नगरसेवक निखील वारे, दीप चव्हाण आदींनी महापालिका आयुक्‍तांना निवेदने दिली. 

दीप चव्हाण यांनी हे मशीन जिल्हा रुग्णालयाला वापरण्यासाठी देण्याची मागणी तत्कालीन जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाला विचारणा केली असता, त्यांनीही मशीन सुरू करण्यास असमर्थता दर्शविली.

अखेर महापालिका प्रशासनाने हे मशीन चालविण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्सला ठेका देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला आहे. 

वीज, पाणी मोफत, एक रुपया भाडे 
एमआरआय मशीन कार्यान्वित करण्यासाठी "लोकमान्य'ने महापालिकेकडे 1 कोटी 67 लाख रुपयांच्या बिलाची मागणी केली आहे. हे बिल मिळाल्यावर दोन महिन्यांनी मशीन कार्यान्वित केले जाणार आहे.

एमआरआय मशीन चालविण्यासाठी प्रशिक्षित डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांचा खर्च संस्था करणार आहे. त्यांच्याकडून महापालिकेने वर्षाला केवळ एक रुपया भाडे घ्यावे व वीज, पाणी मोफत द्यावे. ठेकेदार संस्थेला मशीन चालविण्यातून मिळणाऱ्या नफ्यातील केवळ पाच टक्‍केच रक्‍कम महापालिकेला द्यावी, असा हा अजब प्रस्ताव आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal contract to Pimpri Chinchwad Hospital nagar news