महापालिकेची कोरोना टेस्ट आता सशुल्क : केंद्राचे झाले खासगीकरण 

amc nagar
amc nagar

नगर : शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे कोरोना वरील उपाय योजना महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या अवाक्‍या बाहेर जाऊ लागल्या आहेत. महापालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांसाठी सुमारे आठ दिवसांपूर्वी मोफत स्वॅप संकलन केंद्र सिव्हील हडकोमध्ये सुरू केले होते. या स्वॅप केंद्राचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आज दुपारपासून या संकलन केंद्रात नागरिकांना सशुल्क स्वॅप तपासून घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे गरिब नागरिकांनाही महापालिकेच्या स्वॅप संकलन केंद्रात पैसे खर्च करावे लागणार आहेत. 

लॉकडाउनमुळे शहरात आधीच रोजगार बंद आहेत. शहरातील बाजारपेठा बंद असल्याने हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कंटेन्मेंट झोनमधील गरिब व गरजू नागरिकांना मोफत अन्नाचे पॅकेट देत असताना महापालिकेचे स्वॅप संकलन केंद्र मात्र नागरिकांकडून पैसे घेणार आहे. त्यामुळे कोरोनाची तपासणी व उपचार गरिब नागरिकांच्या अवाक्‍याबाहेर जाणार असल्याचे चित्र आहे. 

शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल (ता. 14) जिल्हा रुग्णालयाकडे रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवसात 112 कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅप जिल्हा रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता. महापालिकेने शहरातील नागरिकांच्या मोफत कोरोना चाचण्या करून घेण्यासाठी आठवड्या भरापूर्वी स्वॅप संकलन केंद्र सुरू केले होते. जिल्ह्यातील नागरिकांचे स्वॅप जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येतात. मात्र या लॅबमध्ये एक हजारपेक्षाही जास्त रुग्णांचे स्वॅप तपासणी अभावी पडून आहेत. महापालिकेने मोफत सुरू केलेल्या स्वॅप संकलन केंद्रातही त्यामुळे संकलन बंद आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे स्वॅप तपासणी खासगी लॅबकडून करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरातील गरिब नागरिकांना कोरोना विषयक चाचण्या करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 

कोरोनाच्या भीतीने महापालिकेच्या नवीन इमारतीतील कर्मचारी सध्या कामावर जात नाहीत. यातच कालपासून (ता. 14) कोरोना प्रतिबंधासाठी शहरात काम करणाऱ्या आशा सेविकांनी संप सुरू केला आहे. महापालिकेचे सिद्धार्थनगरमधील कामगार कंटेन्मेंट झोनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे महापालिकेकडे मनुष्यबळ कमी झाले आहे. शहरातील कोरोनावरील उपाययोजना रामभरोसे होण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com