Ahmednagar : संशयावरून सुनेकडून सासऱ्याचा खून; चिंचोडी पाटीलची घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

संशयावरून सुनेकडून सासऱ्याचा खून; चिंचोडी पाटीलची घटना

अहमदनगर : संशय घेणाऱ्या सासऱ्याचा सुनेनेच खून करण्याची घटना चिचोंडी पाटील (ता.नगर) शिवारात मंगळवारी (ता. 23) सकाळी घडली. अर्जुन गोविंद हजारे (वय 62, रा. चिचोंडी पाटील) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी सून ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) हिच्याविरूद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी बाबासाहेब चंदू बनकर (वय 42, रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अर्जुन हजारे हा सून ज्योतीवर संशय घेत होता. या कारणावरून मंगळवारी सकाळी त्यांच्यात भांडण झाले. भाऊ हजारे यांच्या घरासमोरील रस्त्यावर हे भांडण सुरू होते. या भांडणामध्ये ज्योती हिने अर्जुन हजारे यांच्या डोक्‍यात, कपाळावर, तोंडावर दगड व कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अर्जुन हजारे यांचा मृत्यू झाला आहे.

शवविच्छेदनसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरेआदींनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी ज्योती हजारे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे करीत आहे.

loading image
go to top