नगर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी आणली महत्त्वाची योजना

सूर्यकांत नेटके
Friday, 1 January 2021

खेळते भांडवली कर्ज योजना ही कॅश क्रेडीटचा प्रकार असल्याने त्याची परतफेडीची मुदत ही 31 मार्च असते चालू वर्षात योजना उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये कर्ज परतफेड करावी लागत आहे.

नगर ः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पशुपालनासाठी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेडून आतापर्यत 45 हजार शेतकऱ्यांना 268 कोटी रुपयाचे खेळते भांडवल वाटप केले आहे. एका खातेदार शेतकऱ्याला पंधरा हजारापासून दीड लाखापर्यंत हे भांडवल दिले जात आहे. यंदा पहिल्यांदाच ही योजना राबवली जात असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा बॅंकेकडून सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यात शेतीला पूरक उद्योगाची जोड देण्याला प्राधान्य दिले जाते. त्यात दुध उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, गेल्या पाच वर्षांत दुष्काळ आणि दूधदराचा प्रश्‍न यामुळे दुध व्यवसाय अडचणीत आहे. काही शेतकऱ्यांना नाईलाजाने दुभती जनावरे कमी करावी लागली.

आता दूध उत्पादनाला अधिक बळकटी देण्यासाठी केंद्र शासन व नाबार्ड यांच्या सुचनेनुसार जिल्हा बॅंकांच्या माध्यमातून खेळते भांडवल योजना राबवली जात आहे. यंदा नगर जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बॅंकेकडून नवीन खेळते भांडवल (कॅश क्रेडीट) योजना राबवली जात आहे. या योजनेतून पशुपालनसाठी (गाय/म्हैस) पंधरा हजारापासून दीड लाखापर्यंत कर्जमर्यादा ठरवून जिल्हयातील शेतकऱ्यांना बॅंकेने खेळते भांडवल उपलब्ध करुन दिले जात आहे.

आतापर्यंत जिल्हयातील शेतकऱ्यांना रक्कम कोटीचे कर्ज वाटप केले आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षासाठीच ही योजना लागू असेल. शेतकऱ्यांना या कर्जाची परतफेड ही 31 मार्चपर्यंत करावयाची आहे. या योजनेचा व्याजदर कर्जदार सभासदास सात टक्के आहे. मात्र, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदाला तीन टक्के व्याजात अनुदान सवलत मिळणार आहे.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीत ही आहेत गंमतीशीर चिन्ह

खेळते भांडवली कर्ज योजना ही कॅश क्रेडीटचा प्रकार असल्याने त्याची परतफेडीची मुदत ही 31 मार्च असते चालू वर्षात योजना उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये कर्ज परतफेड करावी लागत आहे. परंतु ही अडचण चालू वर्षापुरतीच आहे. पुढील वर्षी खेळते भांडवल योजना नियमीतपणे होईल, अशी अपेक्षा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन रामदास वाघ, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डीले यांनी सांगितले. 
 

""नगर जिल्ह्यात शेतीबरोबर दुध उत्पादन, पशुपालनाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पशुपालनासाठी खेळते भांडवल योजनेतून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम जिल्हा बॅंक करत आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा फायदा घ्यावा'' 
- सीताराम गायकर, अध्यक्ष, नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar District Bank brings important scheme for farmers