US Election : अमेरिकेप्रमाणेच बिहारमधील निवडणुकीतही बदल दिसेल

अशोक मुरुमकर
Sunday, 8 November 2020

हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे.

अहमदनगर : हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. असं म्हणंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्‌वारे अभिनंदन केले आहे.

बिहारच्या निवडणुकीतही असाच बदल दिसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निव़डणुकीत जो बायडेन यांनी बाजी मारली. जॉर्जिया आणि पेन्सिलवेनियामध्ये कमाल करत बायडेन यांनी सत्ता हस्तगत केली.

निवडणुकीतील प्रचार शिगेला पोचला असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे बायडन यांनी आव्हान उभे केले होते. त्यांच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होत होती. पाऊस सुरु असतानाही त्यांची सभा होती. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं होते. पावसात झालेली त्यांची सभा चांगलीच गाजली होती त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्रातील साताऱ्याच्या सभेची पुनरावृत्ती होईल अशी चार्चा होती. त्यानंर आमदार पवार केलेल्या ट्टिटने अनेकांचे लक्ष वेधले होते. फ्लोरिडा येथे बायडन यांची प्रचार सभा होती. त्यांच्या भाषणावेळी पावसाला सुरूवात झाली. त्या भर पावसातही बायडन यांनी भाषण सुरूच ठेवलं. हे तेथील लोकांना चांगलंच भावलं होतं. या सभेनंतर बायडन यांनी स्वतः ट्विट करून भावना व्यक्त केल्या होत्या. 

राष्ट्रवादीचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान पावसात भाषण केलं होतं. त्या भाषणानंतर संपूर्णपणे राजकीय वातावरण फिरलं आणि विजयाची खात्री वाटणाऱ्या भारतीय जनता पक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायउतार व्हावं लागलं होतं. याच ऐतिहासिक सभेची आठवण रोहित पवार यांनी करून देत ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, जेंव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेंव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो.

जो बायडेन यांच्या विजयानंतर त्यांचे अभिनंदन करताना आमदार पवार यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल, अशी अपेक्षा आहे.

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अखेरच्या टप्प्यात जॉर्जिया आणि पेन्सिल्वेनिया या राज्यांमध्ये विजय मिळवला. यासह ट्रम्प यांचे सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान, निकाल स्पष्ट झाल्यावरसुद्धा आपणच जिंकलो असल्याचा दावा ट्रम्प यांनी ट्विटरवरून केला. मतमोजणीत गैरव्यवहाराचा आरोप याआधी सातत्याने त्यांनी केला असून अवैध मते मोजली नसती तर आपण सहज जिंकलो असतो असंही त्यांनी म्हटलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar news Congratulations to Joe Biden from MLA Rohit Pawar