esakal | तऱ्हाट आरोग्य कर्मचाऱ्याचा पगारासाठी धिंगाणा, पोलिस केसचा विषय निघताच उतरली
sakal

बोलून बातमी शोधा

Violation of discipline by a drunken employee at Akole

कोतुळ ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे कामकाज एकाच ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी एकूण सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे.

तऱ्हाट आरोग्य कर्मचाऱ्याचा पगारासाठी धिंगाणा, पोलिस केसचा विषय निघताच उतरली

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले : तालुक्यातील कोतुळ ग्रामीण रुग्णालयात एका कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत रात्री धिंगाणा घातला! कोतुळ ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी रात्री दहा वाजता वाजता ही घटना घडली.  हा कर्मचारी रात्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांच्या खोलीवर आला. 

माझा ऑकटोबरचा पगार का काढला नाही, असा जाब वैद्यकीय अधीक्षकांना विचारू लागला. त्यांच्याशी हुज्जतही घालू लागला.  मी पगार बिलावर सह्या केल्या आहेत. कोषागारातील तांत्रिक अडचणीमुळे पगार झाला नाही. ही पगार मागण्याची वेळ नाही. सकाळी पाहू असे वैद्यकीय अधीक्षक सांगत असताही तो कर्मचारी ऐकत नव्हता. 

जवळ असलेल्या एका कर्मचाऱ्याने मध्यस्ती  केली सकाळी येण्याची विनंती केली असता त्याचा पारा आणखी चढला आणि कर्मचाऱ्यासोबत त्याने धिंगाणा सुरू केला. इतरांनी मध्यस्ती करून त्याला शांत केले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी समजूत काढली. 

नाईलाजाने पोलीस केस करण्याचा निर्णय मला घ्यावा लागेल, असे सांगताच नशेतील त्या कर्मचारीची उतरली. त्याने लगेच वैद्यकीय अधीक्षकांचे पाय धरले आणि  माफी मागत आपली चूक कबूल केली.

दरम्यान आज शुक्रवारी वैद्यकीय अधीक्षकांनी कर्मचाऱ्याला शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस बजावली. पाच दिवसांत खुलासा मागितला आहे.
 
दरम्यान दारूच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्या बरोबर पगारावरून वाद घालणारा कर्मचारी हा अस्थायी कर्मचारी आहे. तो शिपाई पदावर काम करतो. श्रीरामपूर येथून त्याची शिक्षेवर कोतुळ येथे बदली झाली. गेल्या दोन वर्षांपासून कोतुळ ग्रामीण रुग्णालयात सेवेत आहे,  यापूर्वीही त्याचे अनेकांशी  वाद झाल्याचे समजते. 

रुग्णालयावर उपचाराची गरज!

कोतुळ ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे कामकाज एकाच ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी एकूण सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्हीं पदे रिक्त आहे. एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभारी चार्ज आहे तर ग्रामीण रुग्णालयात चार पदे असताना एकच वैद्यकीय अधिकारी आहे. 

अकोले तालुक्यातील दक्षिण विभागाचे हे मध्यवर्ती सरकारी  रुग्णालय असतानाही आता याच रुग्णालयावर  उपचार करण्याची  वेळ आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा  दिला आहे
अहमदनगर

loading image
go to top