आधी वृक्षारोपण मगच ओलांडलं माप, नेवाशात नववधूचा असाही गृहप्रवेश

सुनील गर्जे
Sunday, 30 August 2020

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाने अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या नेतृत्वाखाली "वर्षातील 365 दिवस दररोज वृक्षारोपण' या उपक्रमातून वेगळे वळण दिले. त्याला काही दिवसांतच तरुणाईचा व समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

नेवासे : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाच्या वेगवेगळ्या उपक्रमांचा समाजमनावर नेहमीच प्रभाव पडल्याचे दिसते. यशवंत प्रतिष्ठानाने दत्तक घेतलेले मोरया चिंचोरे येथे 21 ऑगस्ट रोजी अभिनेते सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत प्रारंभ केलेल्या "वर्षातील 365 दिवस रोज वृक्षारोपण' या उपक्रमास तरुणाईंकडून उत्स्फूर्त मिळत आहे. 

दरम्यान, याच उपक्रमाची प्रेरणा घेत, नवदाम्पत्याने लग्नानंतर घरी न जाता, थेट मोरया चिंचोरे येथील डोंगरावर जाऊन वृक्षारोपण करीत वृक्षसंवर्धनाचा संकल्प सोडला. त्यांचा व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

हेही वाचा - संगमनेरातील हॉटेल्स गजबजली

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाने अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या नेतृत्वाखाली "वर्षातील 365 दिवस दररोज वृक्षारोपण' या उपक्रमातून वेगळे वळण दिले. त्याला काही दिवसांतच तरुणाईचा व समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर म्हसे यांचा मुलगा प्रवीण व सामनगाव (ता. शेवगाव) येथील शिवाजी फाटके यांची मुलगी धनश्री यांचा शुक्रवारी (ता.28) साध्या पद्धतीने विवाह झाला. प्रवीण यांनी विवाहानंतर सोनईला घरी जाण्याऐवजी नववधूसह थेट मोरया चिंचोरे गाठले.

तेथील डोंगरावर स्वत: श्रमदान करीत खड्डा खोदून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संकल्प सोडत वैवाहिक जीवनाला प्रारंभ केला. नवदाम्पत्याचा यशवंत सामाजिक प्रतिष्ठानातर्फे धनंजय वाघ यांच्या हस्ते पुस्तक व रोप देऊन सत्कार करण्यात आला. 

विवाह झाल्यानंतर घरी न जाता, वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प सोडला. यापुढे लग्नाच्या व आमच्या वाढदिवशी येथे येऊन वृक्षारोपण व संवर्धन करणार आहोत. 
- धनश्री व प्रवीण म्हसे, नववधू-वर, सोनई, अहमदनगर.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newlyweds enter Newash after tree planting