फटाक्याच्या आवाजाच्या दुचाक्या सुसाट; वाहतुक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ध्वनीप्रदुषण

गौरव साळुंके
Saturday, 10 October 2020

श्रीरामपूर शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ दिवसेंदविस वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे ध्वनीप्रदुषणासह वायूप्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ दिवसेंदविस वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे ध्वनीप्रदुषणासह वायूप्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यात भर म्हणुन शहरात फटाक्याच्या आवाजाच्या दुचाक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरीकांची डोकेदुखी वाढली आहे. शहर परिसरात सद्या 100 हुन अधिक मोठ्या आवाजाच्या सायलन्सरच्या दुचाक्या भरधाव वेगात धावताना दिसुन येतात.

त्याकडे वाहतुक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तरुणाई फटाक्याचा आवाज काढत भरधाव वेगात दुचाक्या फिरविण्याचा कल वाढत आहे. शहरातील शिवाजी चौकासह प्रमुख चौकात वाहतुक पोलिस उभे असलेले दिसतात. परंतू मोठ्या आवाजाच्या वाहनांवर कुठलीही कारवाई होत नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अनेकदा मोठ्या आवाजाच्या दुचाक्या पोलिसांसमोरुन जोरात निघुन जातात.

फटाक्या सारख्या आवाजाची सायलन्सर लावण्याचा कल तरुणाईमध्ये वाढला आहे. महागड्या दुचाक्या घेवुन त्यांना कर्कश आवाजाचे सायलन्सर बसवुन भरधाव वेगात रस्त्यावर फिरविणारे अनेक तरुण आढळुन येतात. मोठ्या आवाजाच्या सायलन्सरच्या दुचाकीतुन निघणारा आवाज वृद्धांसह लहान बालकांना भीतीदायक वाटत असल्याचे अनेक नागरीक सांगतात. परंतू मोठ्या आवाजाच्या दुचाक्यावर कारवाई करण्यासाठी कोणी तक्रार देत नसल्याने शहरातील ध्वनीप्रदुषण झपाट्याने वाढले आहे. काही महिन्यापुर्वी लॉकडाउन काळात रस्त्यावर वाहन आणण्यास प्रशासनाने मनाई केल्याने शहरात शांततामय वातावरण होते. परंतू लॉकडाउन शथिल केल्यानंतर सर्वांनीच आपआपली वाहने रस्त्यावर आणली आणि रस्त्यावरील खड्यात साचलेल्या धुळीचे लोट पसरले. त्यात कर्कश आवाजाचा कलकलाट वाढल्याने नागरीकांची डोकेदुखी वाढली आहे.

रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना डोळ्याच्या समस्या भेडसावत आहे. तर धुळीमुळे डोळ्यामध्ये जळजळ होण्याचे प्रमाण वाढल्याचे अनेकजण सांगतात. सद्याच्या वाढत्या प्रदुषणामुळे प्रवासात चश्मा आणि मास्क लावणे गरजेचे बनले आहे. वाहतुक पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी शहरातुन होत आहे. वाहतुक नियमांच्या पालनासाठी जनजागृतीसाठी विविध सेवाभावी संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज बनली आहे. त्यामुळे शहरातील वाढते प्रदुषण नियंत्रणात ठेण्यास मदत होणार आहे.

वाहनांची संख्या वाढल्याने प्रदुषणात वाढ होते. प्रदुषण वाढल्यास विविध आजारांचा समाना करावा लागतो. कर्कश आवाजाच्या वाहनांमुळे कानावर आणि मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. वाढत्या प्रदुषणामुळे सार्वजिक आरोग्य धोक्यात येत असुन प्रवासात मास्क आणि चश्मा लावणे गरजेचे आहे. 
- डॉ. रविंद्र जगधने, साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Noise pollution has increased in Shrirampur due to loud vehicles