खड्ड्यांमुळे मंत्र्यांनी झापल्यावर ठेकेदार, अभियंत्यास नोटीस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदार व शाखा अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. मागील आठवड्यात राज्यमंत्री तनपुरे या रस्त्याने जाताना, रस्त्यावरील खड्डे बुजविताना डांबराचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

राहुरी: शेंडी (नगर) ते वांबोरी या 13 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट होत असल्याने, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खडे बोल सुनावल्यावर सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले.

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदार व शाखा अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. मागील आठवड्यात राज्यमंत्री तनपुरे या रस्त्याने जाताना, रस्त्यावरील खड्डे बुजविताना डांबराचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मंत्री तनपुरे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार केली. अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार निकृष्ट काम करीत असल्याने, संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार व राहुरी शाखा उपअभियंता संजय गायकवाड यांनी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. 

एकूण 13पैकी 9 किलोमीटरदरम्यान डांबर व खडीने खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी 13 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. कोरोना संकटामुळे अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत शासनाने दिलेल्या निधीचा विनियोग करताना, कामे गुणवत्तापूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार मंत्री तनपुरे यांनी केली होती.

ठेकेदार तवले यांना दिलेल्या नोटिशीत "निर्देशाप्रमाणे व गुणवत्तापूर्वक काम विहित मुदतीत पूर्ण करावे, अन्यथा बिल अदा केले जाणार नाही. दंडात्मक कारवाई केली जाईल,' अशी तंबी दिली आहे. कामावर देखरेख करणारे शाखा अभियंता सागर कोतकर यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. 

शेंडी (नगर) ते वांबोरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची सोमवारी (ता. 4) प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात मंत्री तनपुरे यांच्या तक्रारीत तथ्य आढळले. संबंधित ठेकेदार व शाखा अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. 
- संजय पवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to the contractor, engineer when the minister gets angry due to the road