शेकरूंची संख्या वाढली 

shekru
shekru

अकोले : कोरोनामुळे कळसूबाई- हरिश्‍चंद्रगड अभयारण्यातील पशू-पक्ष्यांच्या गणनेवरही परिणाम झाल्याचे दिसते. मात्र, काही निसर्गप्रेमी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेकरूच्या घरट्यांची पाहणी करून, गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे साडेपाचशे शेकरू जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

वन्य जीव विभागाच्या माहितीनुसार, कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात आतापर्यंत शेकरूंची 1199 घरटी आढळली; मात्र त्यांची संख्या 556 असून, संख्या वाढल्याने वनप्रेमींनी समाधान व्यक्त केले. पावसाळ्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवितात. त्यामुळे शेकरूंची गणना मेमध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यात त्यांची संख्या प्राप्त झाली, की हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते. त्यामुळे अंतिम आकडा जूनमध्ये मिळतो, असे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळ यांनी सांगितले. 

जीपीएस तंत्राद्वारे ही गणना केली जाते. शेकरूंच्या नोंदीचे काम कोरोना संकटामुळे झाले नाही. घाटघर परिसरात 17 शेकरू असल्याचा अंदाज आहे. हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात 543 घरटी आढळली. इतरत्र त्यांचा अधिवास आहे का, याचाही शोध घेतला जात असल्याचे वनअधिकारी अमोल आडे यांनी सांगितले. 

शेकरूची वैशिष्ट्ये 
वजन दोन ते अडीच किलो, लांबी अडीच ते तीन फूट, डोळे गुंजांसारखे लाल. मिशा, अंगभर तपकिरी तलमकोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, शेपटी लांब व झुपकेदार असते. वर्षातून एकदाच डिसेंबर- जानेवारीत शेकरू पिलाला जन्म देते. झाडाच्या छोट्या फांद्यांवर एक शेकरू सहा ते आठ घरटी तयार करते. ते 15 ते 20 फूट लांब उडी मारू शकते. विविध फळे व फुलांतील मध हे त्याचे खाद्य असते. महाराष्ट्रात भीमाशंकर, कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड अभयारण्य, आजोबा डोंगररांगा, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबात शेकरू आढळतात. अतिशय देखण्या आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातींपैकी शेकरू एक आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांत दाट जंगलांत त्याचे वास्तव्य आढळून येते. अलीकडे तळकोकणात त्यांची संख्या वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com