साई संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी मागितली भिक्षा

Officials of Sai Sansthan begged
Officials of Sai Sansthan begged

शिर्डी ः साईबाबांचे मंदिर गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. दान पेट्या रिकाम्या आहेत. एरवी या काळात मिळणा-या सुमारे चारशे कोटी रूपयांच्या उत्पन्नाला साईसंस्थानला मुकावे लागले. तर बाबांच्या झोळीतील सव्वाशे कोटी खर्ची पडले.

ज्या भाविकांनी आजवर बाबांची झोळी भरली त्यांच्या अनुपस्थीतीत आज बाबांचा 102 वा पुण्यतिथी उत्सव पार पडला. साईबाबांनी आयुष्यभर काखेत झोळी अडकवून पाच घरी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. त्यांच्या या स्मृतीला वंदन करण्यासाठी आज ग्रामस्थ व साई संस्थानच्या अधिका-यांनी काखेत झोळी अडकवली. घरोघर जाऊन भिक्षा मागीतली. आजच्या उत्सवाचे हे प्रमुख वैशिष्ट होते. 

भिक्षा झोळीच्या निमित्ताने सात महिन्याच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच ग्रामस्थांना मंदिर परिसराच्या बाहेर उत्सवात सहभाग घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे शुकशूकाट असलेला हा परिसर साईनामाच्या गजराने दुमदूमून गेला. प्रथा परंपरे प्रमाणे साई मंदिरातील धार्मिक कार्यक्रम पार पडले.

त्यात साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे, उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखापाल बाबासाहेब घोरपडे, अभियंता रघुनाथ आहेर, साईमंदिर प्रमुख रमेश चौधरी आदिंनी सहभाग घेतला. साईंच्या भिक्षेक-यांचे ठिकठीकाणी भक्तीपूर्वक स्वागत झाले. तब्बल पन्नास पोते गव्हू भांडारात जमा झाले. 

साईबाबा संन्यस्त जिवन जगले. मात्र त्यांच्या दरबारात रंजल्या गांजल्या पासून ते धनिक व उच्च पदस्थांचा राबता असे. दानशुर दात्यांची त्यांच्या हयातीतही कमी नव्हती. गेल्या एकशे दोन वर्षात हि पंरपरा कायम राहीली. या दानशुर भाविकांनी बाबांच्या झोळीत आजवर चारशे साठ किलो सोने, साडे पाच हजार किलो चांदी आणि सुमारे बावीसशे कोटी रूपयांच्या ठेवी दान म्हणून अर्पण केल्या आहेत.

बाबांनी आयुष्यभर रंजल्या गांजल्यांची सेवा केली. भाविकांकडून घेतले आणि गरजवंताना वाटले. साईसंस्थानची वाटचाल आजही त्याच मार्गावरून सुरू आहे. गरजू रूग्णांसाठी जवळपास मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ज्या भाविकांनी बाबांची झोळी भरली त्यांच्या सुविधांसाठी अनेक प्रकल्प प्रतिक्षेत असतानाही येथून जवळपास दिडशे कोटी रूपयांची रक्कम बाहेर नेण्यात आली. आता तर सात महिन्यांपासून उत्पन्न बंद झाले आहे. बाबांच्या स्मृती जतन करण्यासाठी आज ग्रामस्थ व अधिका-यांनी भिक्षा झोळी फिरविली.कोविडचा कहर कमी झाला की साई मंदिराचे दरवाजे उघडतील. पुन्हा भाविकांची रिघ सुरू होईल. बाबांची झोळी हळू हळू भरू लागेल. 

संपादन - अशोक निंबाळकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com