ज्वारीवर कांद्याची कुरघोडी ;रानडुकरे, पिकांमधील बदलाचाही परिणाम

पेरणी केवळ सहा टक्के
nagar
nagarsakal

अहमदनगर : आधुनिकतेकडे शेतकरी वळत असताना परंपरागत ज्वारीच्या पिकाकडे दुर्लक्ष करू लागला आहे. काळानुसार पिकांमधील बदल, रानडुकरांचा उपद्रव, बाजारपेठेत दराची तफावत आदी कारणांबरोबरच कांदालागवडीचे वाढलेले क्षेत्रही त्याला कारणीभूत आहे. कांद्याची लागवड अद्याप सुरू आहे.

जिल्ह्यात साखर कारखान्यांमुळे उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानानुसार पीक पॅटर्न शेतकरी घेतात. त्यामध्ये खरिपात बाजरी, मूग, सोयाबीन अशी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात होती. रब्बीमध्ये ज्वारी, कडधान्य, गहू आदी पिकांवर भर असे. गेल्या काही वर्षांपासून कांद्याची बाजारपेठे शेतकऱ्यांना माहिती झाली. हळूहळू लोक कांदा पिकाकडे वळले. सध्या तर कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. खरीप व रब्बीतही हे उत्पादन घेतले जाते. चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधनही होऊ शकला. या सर्व बदलांमध्ये ज्वारीचे पीक मागे पडले. जिल्ह्यातील जामखेड-कर्जत तालुके वगळता इतर ठिकाणी ज्वारीचे पीक अत्यंत कमी आढळते. यंदा तर केवळ सहा टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे.

ज्वारीचे क्षेत्र सरासरी 4 लाख 77 हजार 18 हेक्टर आहे. या वर्षी त्यापैकी केवळ 41हजार 776 हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चालले आहे. बाजरीपेक्षा कांद्याला चांगला दर मिळतो. शिवाय ताजा व एकरकमी पैसा पाहण्यास मिळतो. त्यातून बहुतेक शेतकऱ्यांनी शेतात सुंदर बंगले बांधले आहेत. कांद्याचे दर देशाच्या आयात-निर्यातीवरही अवलंबून असतात. त्यामुळे शेतकरी नेतेही याप्रश्नी आवाज उठवितात. त्याचा परिणाम कांद्याला चांगला दर मिळतो.

गेल्या वीस वर्षांपासून वृक्षारोपणाची मोहीम सरकारने राबविली. त्याचा परिणाम वन्य प्राणी वाढले. विशेषतः रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढली. ही डुकरे अन्नाच्या शोधात शेतात येतात. पिकांची नासाडी करतात. विशेषतः ज्वारीची ताटे वाकवून कणीस खातात. डुकरांचे कळप आल्यानंतर संपूर्ण पिकाची नासाडी होते. याला कंटाळून बहुतेक शेतकऱ्यांनी हे पीक घेणेच बंद केले आहे. त्याचाही परिणाम ज्वारीचे क्षेत्र घटण्यावर झाले आहे. पाथर्डी, नगर तालुका, जामखेड, कर्जत, आदी ठिकाणी ज्वारी बऱ्यापैकी पिकविली जाते. हळूहळू पाण्याची उपलब्धता होऊन तेथेही हे शेतकरी इतर पिकांकडे वळू लागले आहेत

nagar
पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची गरज; रामदास आठवले

जिल्ह्यात बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. कांदा हे चांगले पैसे मिळवून देणारे पीक आहे. बागायती क्षेत्रात ज्वारी परवडत नसल्याने शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत. संकरित ज्वारीचे उत्पादन जास्त मिळत असले, तरी त्याला बाजारपेठेत चांगला दर मिळत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हे पीक परवडत नाही. कोरडवाहू भागात मात्र ज्वारीशिवाय पर्यायच राहत नाही.

- डॉ. अशोक ढगे, कृषी शास्त्रज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com