
Akole News : दर घसरल्याने कांदा, टोमॅटो रस्त्यावर
अकोले : कांदा, टोमॅटो, फुले कवडीमोलाने विकावी लागत असल्याने शेतकरी हा माल रस्त्यावर फेकून देत आहेत. दुसरीकडे, राजूरच्या आठवडे बाजारात पाच रुपये किलोने टोमॅटो, तर सात रुपये किलोने कांदा मिळत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
तालुक्यातील विठा, इंदोरी, कळस येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने टोमॅटो, कांदा, फुलांचे पीक घेतले आहे. काळ्या मातीत पिकविलेला शेतीमाल बाजारात आणल्यावर त्याला भाव मिळत नाही. लागवडीसाठी खर्च केलेले पैसेही शेतमाल विकून मिळत नसल्याने व भाडेही सुटत नसल्याने, मिळेल त्या भावात आपला माल त्यांना विकावा लागत आहे. काही शेतकऱ्यांनी वैतागून टोमॅटो, कांदा, फुले रस्त्यावर फेकून दिली आहेत.
राजूरच्या आठवडे बाजारात सकाळी दहा रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात होता, मात्र दुपारनंतर ग्राहकांनी पाठ फिरविल्याने हा भाव पाच रुपयांवर आला. सायंकाळी तीन रुपये किलोपर्यंत दर खाली आला. तीच स्थिती कांद्याची होती. दर कोसळल्याने काही शेतकऱ्यांनी हा माल रस्त्यावर फेकून देत निषेध नोंदविला.
राजूरच्या आठवडे बाजारात टोमॅटो, कांदा, भाजीपाला विकण्यासाठी आणला, मात्र भाव नसल्याने कवडीमोलाने तो विकावा लागला. शेवटी शेवटी दोन रुपये किलोने टोमॅटो विकले. तेच कांद्याचेही झाले.
- मंगल शिंदे, शेतकरी