नगर जिल्ह्यात किती कांदा लागवड झालीय माहितीय?

सूर्यकांत नेटके
Thursday, 24 December 2020

नगर जिल्हयात खरिप, लेट खरिप, रब्बी व उन्हाळी मिळून साधारण 1 लाख 30 हजार हेक्‍टरपर्यत लागवड होत असते. यंदा पाण्याची उपलब्धता अधिक आहे. मात्र यंदा कांदा उत्पादक सतत अडचणीत आहेत.

नगर ः दरात पडझड, पाऊस व वातावरणामुळे सातत्याने होत नुकसान होत असल्याने उत्पादक अडचणीत असला तरी नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा आतापर्यत रब्बीत तब्बल 1 लाख 6 हजार 402 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अजून किमान पंचवीस हजार हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे. 

नगर जिल्हयात खरिप, लेट खरिप, रब्बी व उन्हाळी मिळून साधारण 1 लाख 30 हजार हेक्‍टरपर्यत लागवड होत असते. यंदा पाण्याची उपलब्धता अधिक आहे. मात्र यंदा कांदा उत्पादक सतत अडचणीत आहेत.

हेही वाचा - अण्णांच्या मनधरणीसाठी भाजपचे संकटमोचन

कोरोना काळात कांद्याचे दर पडलेले होते. पावसाने जवळपास पंधरा हजार हेक्‍टर क्षेत्रावर नुकसान झाले. त्यानंतर परतीच्या पावसानेही कांदा उत्पादक अडचणीत आले. रब्बीत लागवड करण्यासाठी गावराण बियाणे मिळाले नसल्याने चढ्या दराने बियाणे खरेदी करुन लागवड करावी लागली.

आताही पंधरा दिवसापासून दरात सतत चढउतार होत आहे. तरीही यंदा 1 लाख 6 हजार 402 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अजूनही कांदा लागवडी सुरुच आहेत. खरिपात पंचवीस हजार हेक्‍टवर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली होती. यंदा कांदा उत्पादक सातत्याने अडचणीत असतानाही शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. 

आतापर्यत झालेली तालुकानिहाय कांदा लागवड क्षेत्र (हेक्‍टर) 
नगर ः 17,529, पारनेर ः 23,258, श्रीगोंदा ः14, 925, कर्जत ः 9,991, जामखेड ः 3,250, शेवगाव ः 3,066, पाथर्डी ः7,148, नेवासा ः 1,713, राहुरी ः2,560 , संगमनेर ः7,732, अकोले ः 2,809, कोपरगाव ः 6,174, श्रीरामपुर ः 3,569, राहाता ः 2,678. 

लाल कांद्याची अधिक लागवड 

नगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रींगोंदा, पाथर्डी तालुक्‍यात सर्वाधिक कांद्याचे पीक घेतले जाते. रब्बीत बहूतांश शेतकरी गावराण कांद्याची लागवड करत असतात. यंदा मात्र गावराण कांद्याचे बियाणाचा तुटवडा निर्माण झाला असल्याने पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी लाल कांदा व घरगुती तयार केलेले बियाणे लागवडीसाठी वापरले आहे. त्यामुळे यंदा फार काळ कांदा साठवण करता येणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे मार्च ते एप्रिल काळात बाजारात कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion was planted on one lakh hectares in Nagar district