मृत शेळीला आणण्याचे फर्मान

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; शवविच्छेदनासाठी वेळ मिळेना
ahmednagar
ahmednagarsakal

श्रीगोंदे : चिंभळे (ता. श्रीगोंदे) येथील दत्तू कुशाबा कोळेकर या शेतकऱ्याच्या शेळीवर दोन दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला. ती आज सकाळी मृत झाली. शेळीच्या उत्तरीय तपासणीसाठी संबंधिताने काष्टीतील पशुधन विकास अधिकारी प्रशांत खटके यांना फोन केला. मात्र, त्यांनी पंचायत समितीत कामे असल्याने सायंकाळी शेळी काष्टीला आणण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे हतबल झालेल्या कोळेकरांनी मृत शेळी पंचायत समितीच्या कार्यालयात आणून ठेवली.

चिंभळेत गेल्या काही महिन्यांत बिबट्याकडून कुत्री व शेळ्या ठार मारण्याचे प्रमाण वाढले आहे. पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात ठार होतात. अगोदरच अस्वस्थ व भयभीत शेतकऱ्यांवर सरकारी अधिकारीही रुबाब दाखवतात.

चिंभळेतील कोळेकरांच्या शेळीवर दोन दिवसांपूर्वी बिबट्याने झडप घातली. शेळी वाचविण्यात त्यांना अपयश आले. मात्र, ती जखमी झाल्याने आज सकाळी मरण पावली. मृत शेळीच्या उत्तरीय तपासणीसाठी कोळेकरांनी काष्टीतील पशुधन विकास अधिकारी खटके यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी वेळ नसल्याचे सांगत, तुम्हीच सांयकाळी शेळी काष्टीला आणा, असे सांगितले. ग्रामपंचायत सदस्य संजय सावंत व कोळेकरांनी ही शेळी त्याच अवस्थेत थेट पंचायत समितीच्या कार्यालयात आणली. गटविकास अधिकारी तेथे नसल्याने, ते येईपर्यंत आणि खटकेंवर कारवाई होत नाही तोपर्यंत शेळी जागीच ठेवण्याचा इशारा दिला. दरम्यान, सावंत यांनी, खटके यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असून, त्यांची बदली करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

पंचायत समितीत लेखापरीक्षण होते. आम्ही घटनास्थळी जाऊन शवविच्छेदन करीत नाही. त्यामुळे शेळी काष्टीला घेऊन या, असे सांगितले होते. मात्र, ते पंचायत समितीत आले.

- प्रशांत खटके, पशुधन विकास अधिकारी, काष्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com