परभणी जिल्ह्यातील मजुरांच्या टेम्पोला पाथर्डीत अपघात

Parbhani laborers' vehicle met with an accident at Pathardi
Parbhani laborers' vehicle met with an accident at Pathardi

पाथर्डी ः मुंबईहून परभणी जिल्ह्यात मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो राष्ट्रीय महामार्गावर उलटून 21 जण जखमी झाले. खरवंडी कासार शिवारात आज सकाळी हा अपघात झाला. जखमींपैकी अकरा जणांना नगर येथे हलविण्यात आले आहे. त्यांत एका वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. 

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्‍यातील 48 मजूर सहा महिन्यांपूर्वी मुंबई येथे मजुरीसाठी गेले होते. ते सर्व जण चंदू राजाराम मांजरे या ठेकेदाराच्या हाताखाली काम करीत होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या सर्व मजुरांना घेऊन मांजरे टेम्पोने आज पहाटे मुंबईहून निघाले. पुणे व नगरमार्गे ते तालुक्‍यातील खरवंडी कासार येथे सकाळी नऊच्या सुमारास आले. खरवंडी गावाच्या अलीकडे वडाची भेट या ठिकाणी वळणावर त्यांचा टेम्पो उलटला. तेथून दुचाकीवरून जाणाऱ्या काही तरुणांनी टेम्पोचे मागील शटर उघडून सर्व जखमींना बाहेर काढले.

जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर डॉ. मनीषा खेडकर, डॉ. विनोद गर्जे, डॉ. नवनाथ आव्हाड व इतर कर्मचाऱ्यांनी उपचार केले. त्यांतील अकरा गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सहायक निरीक्षक वसंत पवार यांनी भेट दिली व घटनेची माहिती घेतली. 
 
पोत्यांमागे लपून बसले होते मजूर 
टेम्पोचालकाने टेम्पोच्या मागील बाजूस भरलेली काही पोती ठेवली होती. या पोत्यांमागे मजुरांना बसविल्याने मुंबई ते खरवंडी कासारदरम्यानच्या चेकपोस्टवर बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना कोणताही संशय न आल्याने हा टेम्पो पाथर्डी तालुक्‍याच्या हद्दीपर्यंत येऊ शकला. अपघातात ठेकेदार मांजरे यांच्यासह टेम्पोमालक फूलन पंडित धोत्रे व टेम्पोचालक संतोषकुमार लालबहादूर यादव हेही जखमी झाले आहेत. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. 

शासकीय पाच रुग्णवाहिका आल्याच नाहीत! 
अपघातात गंभीर जखमी झालेल्या अकरा जणांना तातडीने नगर येथे हलविणे आवश्‍यक असल्याने, तालुक्‍यात कार्यरत असलेल्या पाच शासकीय रुग्णवाहिकांच्या चालकांना कळविण्यात आले; मात्र एकही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर डॉ. मनीषा खेडकर यांनी तातडीने तीन खासगी रुग्णवाहिकांना पाचारण करत गंभीर जखमींना नगरला पाठविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com