पारनेर : पाणीयोजनेसाठी अवघ्या रुपयात दिली एकरभर जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी नगरसेवक आनंदा औटी व शिक्षक नेते संभाजी औटी

पारनेर : पाणीयोजनेसाठी अवघ्या रुपयात दिली एकरभर जागा

पारनेर: पारनेर शहरासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांची पाणीयोजना प्रस्तावित आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याची तयारीही दाखविली आहे. ही योजना मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून कार्यान्वित होणार आहे. जलकुंभ, पंप हाऊस, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागेची गरज होती. त्याकरिता स्व-मालकीची 38 गुंठे जागा माजी नगरसेवक आनंदा औटी व शिक्षक नेते संभाजी औटी यांनी नगरपंचायतीस अवघा एक रुपया मोबदला घेऊन बक्षीसपत्र करून दिली. त्यांच्या दातृत्वाचे शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.

शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून बिकट आहे. मात्र, आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारात, तसेच निवडून आल्यावर पारनेरकरांना शब्द दिला आहे. शहरासाठी कायमस्वरूपीची पिण्याच्या पाण्याची योजना केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा त्यांचा संकल्प होता.आमदार लंके हट्टाला पेटले असून, त्यांनी आता पाणीयोजनेसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यास सुरवात केली आहे.

या पाणीयोजनेचा सुमारे शंभर कोटी रुपयांच्या योजनेचा आराखडा तयार झाला आहे. मुळा बॅकवॉटरमधून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा निधीही उपमुख्यमंत्री पवार यांनी देण्याचे कबूल केले. या योजनेसाठी शहरालगत पंप हाऊस, जलकुंभ, शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी जागेची नितांत गरज होती. मात्र, नगरपंचायतीची स्व-मालकीची जागा नसल्याने योजनेच्या प्रस्तावात त्रुटी येत होती. ही बाब औटी बंधूंना समजली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला, शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न यानिमित्ताने सुटत असल्याचा विचार करून, तसेच शहरातील जनतेची अडचण विचारात घेऊन, कोणताही मोबदला न घेता जागा देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यांनी नगरपंचायतीच्या नावे 38 गुंठे जागा फक्त एक रूपया मोबदला घेऊन बक्षीसपत्र करून दिली.

आमदारांनी मानले आभार

शहरासाठी एवढी मोठी जागा विनामोबदला दिल्याबद्दल आमदार लंके यांच्यासह शहरवासीयांनी औटी बंधूंचे आभार मानले, तसेच त्यांच्या दातृत्वाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

Web Title: Parner Acre Land Allotted Water Supply Just

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..