Ahmednagar : लोकांनी थांबवलंय, गप्प बसा ; अजित पवार यांचा राम शिंदेंना सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

लोकांनी थांबवलंय, गप्प बसा ; अजित पवार यांचा राम शिंदेंना सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामखेड : ‘‘तुम्ही दहा वर्षे आमदार, मंत्री होता. त्या वेळी केलेल्या कामांचा दर्जा लोकांना कळतो. ज्यांनी कामे केली, त्यांनाच श्रेय द्या. आता जरा गपगुमान बसा. लोकांनी तुम्हाला थांबवलेले आहे, ते मान्य करा. आपले कुठे चुकले, आपण कुठे कमी पडलो, त्याचे आत्मपरीक्षण करा. त्यातून बोध घ्या,’’ असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना दिला.

जामखेड येथे २३० कोटी रुपये खर्चाच्या ३२ विकासकामांचा प्रारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज झाला. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, आमदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, सभापती राजश्री मोरे, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, शहाजी राजेभोसले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

पवार म्हणाले, की ज्यांनी जे काम केले आहे, त्यांना त्याचे श्रेय दिले पाहिजे. आम्ही आमदारांचा निधी चार कोटी केला. केंद्राने मात्र खासदारांचा निधी बंद केला होता. येथील आधीच्या आमदारांच्या कामाचा दर्जा चांगला नव्हता. त्यामुळे केलेले रस्ते लवकर खराब झाले, इतर कामंही अडचणीत आले आहेत. हाती घेतलेली विकास कामे दर्जेदार करा, यापुढील प्रस्तावित कामांना निधी कमी पडू देणार नाही.

आमदार रोहित पवार म्हणाले, ‘‘माझ्या आधीच्या लोकप्रतिनिधींनी मंत्री असताना जेवढे रस्ते मंजूर केले, त्याहीपेक्षा अधिक रस्ते आपण मंजूर केले. मंजूर केलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे खोटे बोलून श्रेय घेऊ नका. लोक तुम्हाला ओळखून आहेत, म्हणूनच तुम्हाला विश्रांती दिली.’’

दरम्यान, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती विकास बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीसारखा व्हावा, याकरिता निधी द्यावा, या आमदार रोहित पवार यांनी केलेल्या मागणीचा धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजार समितीवर चांगल्या विचारांची माणसं निवडून द्यायला हवीत. सत्तांतर केल्यास येथील विकास कामे मार्गी लावण्याची ग्वाही अजित पवारांनी दिली.

फडणवीसांकडून दिशाभूल

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सभेत नळपाणी पुरवठा योजनेच्या तत्त्वतः मान्यतेचे पत्र दाखविले होते. थातुरमातूर सांगून जामखेडकरांची दिशाभूल केली होती. मात्र रोहित पवार आमदार झाल्यानंतर येथील पाणी योजनेचे फेरसर्वेक्षण करून मंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. १४० कोटीची योजना मंजूर करून घेतली. योजनेतून वगळलेल्या चाळीस टक्के भागाचा समावेश देखील केला. त्यामुळे विनाकारण योजनेचे श्रेय कोणी घेऊ नये, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

loading image
go to top