एकच रस्ता दोनदा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत, अंदाजपत्रकही झाले तरी...

विलास कुलकर्णी
Saturday, 12 September 2020

नगर- कोपरगाव रस्ता दोनदा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला. केंद्र सरकारच्या रस्ते बांधणीत प्राधान्यक्रमावर पोहोचला. सहा पदरी महामार्गाचे अंदाजपत्रक झाले. परंतु, माशी शिंकली.

राहुरी (अहमदनगर) : नगर- कोपरगाव रस्ता दोनदा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला. केंद्र सरकारच्या रस्ते बांधणीत प्राधान्यक्रमावर पोहोचला. सहा पदरी महामार्गाचे अंदाजपत्रक झाले. परंतु, माशी शिंकली. सुरत- हैदराबाद ग्रीनफिल्ड रस्त्याची नवीन संकल्पना आली. त्यावर, केंद्र सरकारचे लक्ष केंद्रित झाले. नगर- कोपरगाव रस्ता दुर्लक्षित झाला. 

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे रस्ता वर्ग झाला नाही. आता, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कोविडमुळे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याची राज्याची ऐपत नाही. केंद्र सरकार ऐकत नाही. त्यामुळे, प्रवाशांचे मरण होत आहे. दक्षिण व मध्य भारताला जोडणारा महत्त्वाचा दुवा; मध्यप्रदेश ते हैदराबाद प्रवासासाठी जवळचा मार्ग असल्याने नगर- मनमाड रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. २० वर्षांपूर्वी नगर- कोपरगाव दरम्यान चौपदरीकरण झाले. त्यावेळी 18 ते 20 टन वाहतूक क्षमतेची वाहने होती. त्यादृष्टीने रस्त्याचे बांधकाम झाले. आता, आधुनिकीकरण झाले. 50 टनी क्षमतेची वाहने धावू लागली. रस्त्याची भारतोलन क्षमता घटली. रस्ता जागोजागी फुटला.
सुरत- हैदराबाद ग्रीनफिल्ड रस्त्याची संकल्पना आली. नाशिक जिल्ह्यातून संगमनेर, राहुरी, नगर तालुका ते करमाळा अशा नवीन रस्त्याचे सर्वेक्षण झाले. अंदाजपत्रक तयार करण्यात आले. 

भूमी अधिग्रहणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या. नवीन रस्त्याच्या हालचालींना वेग आला. त्यामुळे, नगर-कोपरगाव रस्ता ताब्यात घेतला. तर, त्याचे बांधकाम करावे लागेल. या कारणामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्ता ताब्यात घेण्यास टाळाटाळ सुरू केली. रस्ता दुर्लक्षित झाला.

राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा केली. निधी मंजूर केले. दोन वर्षापूर्वी नगर ते कोल्हार दरम्यान सोळा कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली. परंतु, रस्ता खड्डेमुक्त ऐवजी प्रचंड खड्डेयुक्त झाला. नव्याने खड्डे पडले. त्यांच्या दुरुस्तीची कामे निविदेत नाहीत. त्यामुळे, मार्च 2020 अर्थसंकल्पात नगर ते कोल्हार दरम्यान 60 कोटी व कोल्हार ते कोपरगाव दरम्यान 75 कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यात, सतत खराब होणाऱ्या ठिकाणी 200 मीटरच्या तुकड्यात कॉंक्रिटीकरण करायचे. इतर खराब ठिकाणी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करायचे. अशी कामे प्रस्तावित आहे.

परंतु, कोरोनाचे थैमान सुरू झाले. शासनाने नवीन कामे थांबविली. आता, तुटपुंज्या निधीतून खड्डे भरले जात आहेत. एक-दोन पावसात खड्डे पुन्हा उघडे पडत आहेत. त्यात, पावसाचे पाणी साचते. खड्डे दिसत नाहीत. वाहने आदळून किंवा खड्डे चुकवतांना अपघात होतात. वाहनांचे स्पेअर पार्ट व प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. काहींना अपंगत्व, तर काहींना जीव गमवावा लागत आहे. 

नगर-कोपरगाव-मनमाड रस्ता हस्तांतरणासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केले. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. नांदगाव ते विळद, राहुरी, राहुरी फॅक्टरी, कोल्हार पूल येथे रस्ता सर्वाधिक खराब झाला आहे. खड्डे दुरुस्तीसाठी तुटपुंजा निधी मिळत आहेत. 
- नरेंद्र राजगुरु, कार्यकारी अभियंता, जागतिक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits on Nagar Kopargaon National Highway