नेवाशातील संवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर

सुनील गर्जे
Thursday, 14 January 2021

उर्वरित ५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून

नेवासे : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ( ता.  १५) रोजी मतदान होत आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नेवासे तालुक्यात ग्रामपंचायतींची निवडणूक होत असलेल्या ५२ पैकी २० संवेदनशील गावे असून त्यातील दोन गावे बिबविरोध झाल्याने १८ गावातील मतदान केंद्रांवर पोलिसांचा विशेष 'लक्ष ' राहणार आहे. त्यासाठी निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे.  

कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या नेवासे तालुक्यातील ५९  ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाचा आलेख खाली आल्याने  ५९ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ग्रामपंचायतसाठी शुक्रवारी प्रत्यक्षात मतदान होत आहे.  

तालुक्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यात संवेदनशील केंद्रांत गणल्या जाणाऱ्या शनि शिंगणापूर व खरवंडी या दोन ग्रामपंचायती आहेत. उर्वरित ५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेवासे पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन सहाययक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या पथकाने  संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करीत पथसंचलन करत नागरीकांना शांततेचे आवाहन  केले.

मतदानप्रसंगी कोणताही गैरप्रकार होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने तालुक्यात निवडणुका होत असलेल्या ५३ गावांत एक सहाय्यक पोलीस अधीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, २६५ पोलीस कर्मचारी तसेच राखीव दलाच्या दोन तुकड्या, तर  ८० गृहरक्षक दलाचे जवान असा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

संवेदनशील गावे अशी- देवगाव, चांदे, कुकाणे, सोनई, जेऊर हैबती, गेवराई, गळनिंब,  उस्थळ खालसा, रांजणगाव देवी, घोगरगाव, सलाबतपूर, वरखेड, पिंप्रीशहाली, सुलतानपुर, तेलकुडगाव, तरवडी, शिंगवेतुकाई, भेंडे बुद्रुक, शनि शिंगणापूर, खरवंडी अशी असून यातील भेंडे बुद्रुक, शिंगणापूर, खरवंडी.

 

"मतदान प्रक्रिया शांततेत पारपडण्यासाठी संवेदनशील मतदान केंद्रांची पोलीस प्रशासनाने  पाहणी केली, मतदान प्रक्रियेदरम्यान शांतता राखावी,  मतदानाच्या दिवशी या संवेदनशील केंद्रांवर  पोलीसांचे लक्ष आहे.
- सुदर्शन मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव 

" मतदान प्रक्रिया
शांततेत पार पड़ावी, यासाठी नागरिकांचे
सहकार्य देखील आवश्यक आहे, मतदान
प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे.
-रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police keep an eye on sensitive centers in Nevasa