अबब... डाळिंब विकले एक कोटीचे

सतीश वैजापूरकर
Tuesday, 30 June 2020

डाळिंबाचा हंगाम नुकताच सुरू झाला. येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर आज तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या 15 हजार कॅरट डाळिंबाची विक्री झाली. उत्तम प्रतीच्या फळांना आज प्रतिकिलो चाळीस ते नव्वद रुपये भाव मिळाला.

राहाता ः डाळिंबाचा हंगाम नुकताच सुरू झाला. येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर आज तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या 15 हजार कॅरट डाळिंबाची विक्री झाली. उत्तम प्रतीच्या फळांना आज प्रतिकिलो चाळीस ते नव्वद रुपये भाव मिळाला. सध्या प्रामुख्याने पुणे व नगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील शेतकरी येथे डाळिंब विक्रीसाठी आणत आहेत. 

यंदा हंगामाच्या सुरवातीलाच तुलनेत बऱ्यापैकी भाव आहेत. येथून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांत डाळिंब पाठविले जातात. यंदा उत्तर प्रदेशात आंब्यांचे मोठे उत्पादन झाले. हा आंबा चवीला स्वादिष्ट असतो. तो बाजारात आहे तोपर्यंत अन्य फळांची मागणी वाढू दिली जात नाही. त्यामुळे डाळिंबाचे भाव काहीसे रोखले गेले आहेत. हा आंबा आणखी दोन महिने उत्तर भारतातील प्रमुख बाजारपेठांत विक्रीसाठी उपलब्ध राहील. त्यानंतर त्याचे प्रमाण कमी होत जाईल, तसे अन्य फळांचे भाव वाढतील. हे लक्षात घेऊन पुढील दोन महिन्यांनंतर डाळिंबाचे भाव आणखी वाढतील, असा जाणकारांचा कयास आहे. 

याबाबत माहिती देताना बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर म्हणाले, ""बाजार समितीचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही डाळिंबाच्या मोंढ्यासाठी प्रशस्त शेडची उभारणी केली. कमीत कमी वेळेत मोंढा व्हावा, शेतकऱ्यांना वाट पाहायला लागू नये. लिलाव पारदर्शी पद्धतीने, तसेच शेतकऱ्यांना त्वरित रक्कम अदा व्हावी. याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्याचा परिणाम म्हणून थेट विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी येथे डाळिंब विक्रीसाठी आणतात.'' 

हेही वाचा ः लॉकडाऊनमध्येही विकले 120 रुपये लिटरने दूध

सचिव उद्धव देवकर म्हणाले, ""आठवड्यातून पाच दिवस डाळिंबाचा मोंढा भरतो. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती काळजी घेतली जाते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवली जाते. यंदा डाळिंबाच्या हंगामाच्या सुरवातीला समाधानकारक भाव आहेत.'' 

राहात्याचा डाळिंब मोंढा राज्यात अव्वल

डाळिंबाचा हंगाम पावसाळ्यात सुरू होतो. या काळात पावसाने लिलावापूर्वी मोंढ्यावर फळे भिजली, तर त्याची प्रतवारी आणि टिकाऊपणा ढासळतो. मोंढ्यासाठी पुरेशा शेडची आवश्‍यकता असते. आपण कृषी व पणनमंत्री असताना राज्यातील मोंढ्यांवर शेडच्या उभारणीकडे व व्यापारी संगनमत करून शेतकऱ्यांना लुटणार नाहीत, याकडे सातत्याने लक्ष दिले. त्याचा सध्या राज्यातील डाळिंबउत्पादकांना चांगला फायदा होतो. स्वच्छ व पारदर्शी व्यवहारामुळे राहात्याच्या बाजार समितीचा डाळिंब मोंढा राज्यात अव्वल ठरला आहे. 
- आमदार राधाकृष्ण विखे पाटील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pomegranate sold for one crore