निमगाव जाळी बंधाऱ्याला गेले तडे, परिसतील लोकांना हलवले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

नेहमी पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या निमगावजाळीसह आश्वी परिसरातील गावांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. ओढ्या-नाल्यांना खळखळून पाणी वाहिले. अनेक वर्षांपासून कोरडेठाक पडलेल्या बंधाऱ्यात पाणी साचले.

संगमनेर ः तालुक्‍यातील निमगावजाळी शिवारातील पाण्याने तुडूंब भरलेल्या सिमेंट बंधाऱ्याला तडे गेले आहेत. बंधारा फुटून हानी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आश्वी बुद्रुक येथील गायरानात राहणाऱ्या आठ कुटुंबांना ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने शाळेत हलविले आहे. 

नेहमी पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या निमगावजाळीसह आश्वी परिसरातील गावांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. ओढ्या-नाल्यांना खळखळून पाणी वाहिले. अनेक वर्षांपासून कोरडेठाक पडलेल्या बंधाऱ्यात पाणी साचले.

निमगावजाळी शिवारातील दत्त मंदिरालगतच्या सिमेंट बंधाऱ्याला तडे गेले असून, त्यातून वाहणारे पाणी थेट आश्वी बुद्रुक शिवारातील पूर्वीच भरलेल्या मातीच्या बंधाऱ्याकडे वाहत आहे. या पाण्यामुळे दोन्ही बंधाऱ्यांना तडे जाऊन ते फुटण्याची भीती होती. 

तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराची सरपंच महेश गायकवाड, मंडलाधिकारी एस. आर. चतुरे, तलाठी संग्राम देशमुख, उपसरपंच राहुल जऱ्हाड, पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर आदींनी पाहणी केली. बंधाऱ्यांच्या खालच्या बाजूला गायरानात राहणाऱ्या आठ कुटुंबांना आश्वी इंग्लिश स्कूलमध्ये हलविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of bursting of Nimgaon dam