
बाभुळ मुक्त शहर या उपक्रमाचा शुभारंभ शहरातील प्रमुख पदाधिकारी व विविध सामाजिक संघटना यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.
कर्जत (अहमदनगर) : बाभुळ मुक्त शहर या उपक्रमाचा शुभारंभ शहरातील प्रमुख पदाधिकारी व विविध सामाजिक संघटना यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला. या उपक्रमाचा शहरातील नागरिकांसह स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेसाठी नगरपंचायतीला फायदाच होईल, असा विश्वास मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी व्यक्त केला.
बाभुळ मुक्त कर्जत शहर या उपक्रमाचा शुभारंभ मुख्याधिकारी गोविंद जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुले यांच्या हस्ते करण्यात आला आला. यावेळी कर्जत- जामखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, आर्ट ऑफ लिव्हिंग कर्जत परिवाराचे अध्यक्ष डॉ. मधुकर कोपनर, बहिरोबावाडीचे सरपंच विजय तोरडमल, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नवले, उद्योजक अभय बोरा, वृद्ध भुमिहीहीन संघटनेचे अध्यक्ष शब्बीर पठाण, नितीन देशमुख, अशोक नेवसे, अमोल भगत, ॲड. संग्राम ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
येथील नगरपंचायतीने स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत सहभाग घेतला आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते दोन महिन्यांपासून सातत्याने श्रमदान करत शहर स्वच्छ करीत आहेत. यामुळे शहरात स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचला आहे. येथील नगरपंचायत हद्दीतील खुल्या जागांवरील स्वच्छता करने गरजेचे आहे. यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले होते.
या अवाहनास प्रतिसाद देत कर्जत- जामखेड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक सचिन घुले यांच्या संकल्पनेतून बाभुळ मुक्त कर्जत शहर हे अभियान पुढे आले. कर्जत शहर व उपनगरातील खुल्या जागा वरील बाभळी मुळासकट काढणे यासह इतर स्वच्छता करण्यासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांनी पाच जेसीबी मशीन स्वतः च्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत.
संपादन : अशोक मुरुमकर