समस्यांचे भूत उतरेना! श्रीगोंदेकराच्या पाचवीलाच संघर्ष; ‘कुकडी’चा पाणीप्रश्‍न कायम

संजय आ. काटे
Saturday, 2 January 2021

गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही येथील शेतकऱ्यांसाठी यंदाचा उन्हाळा कडकच जाणार आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही येथील शेतकऱ्यांसाठी यंदाचा उन्हाळा कडकच जाणार आहे. वर्ष बदलले, मात्र "कुकडी'च्या पाण्यासाठीचा संघर्ष आणि इतर समस्यांतून मुक्तता होताना दिसत नाही. रस्त्यांचा प्रश्न मिटण्याऐवजी वाढतच आहे. टॅंकरने पाणी घालून जगविलेल्या फळबागांतून पैसा मिळत नाही.

बेरोजगारी संपविण्यासाठी नेते पुढाकार घेताना दिसत नाही, अशा अनेक समस्या जागीच असल्याने नव्या वर्षातही समस्यांचे भूत श्रीगोंदेकरांच्या मानगुटीवर बसलेलेच राहणार आहे. 

कोरोनाचे वर्ष सरल्याचे समाधान श्रीगोंदेकरांच्या चेहऱ्यावर दिसत असले, तरी इतर समस्यांचे निराकरण होत नसल्याचे वास्तव समोर आल्यावर पुन्हा एकदा हतबलता वाढत आहे. तालुक्‍यातील हिरवीगार शेती दृष्ट लागण्यासारखी आहे. कुकडी, घोड, विसापूर, सीना प्रकल्पांसह भीमा व घोड नद्यांच्या पाण्याने शेती समृद्ध झाली. मात्र, या प्रकल्पांच्या भरवशावर बसलेल्या लाभधारकांना यंदाही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या वर्षी तालुक्‍यात दमदार पाऊस झाला. कुकडी प्रकल्पातील डिंबे धरणातून पावसाचे 10 टीएमसी पाणी खाली वाहून गेले. मात्र, तरी आज माणिकडोह व पिंपळगावजोगे धरणांत मुबलक पाणीसाठा नाही. इतर धरणे भरलेली असली, तरी त्यात पुणेकरांचे नियोजन असल्याने, तेथे श्रीगोंदेकरांचा हक्क नावालाच आहे. आता "कुकडी'तून सुटणारे रब्बीचे आवर्तनही फेब्रवारीत सुटणार नि ते तीन आठवड्यांनी तालुक्‍याला मिळणार. त्यामुळे "कुकडी'खालील शेती संपते की राहते, हे वेळच ठरवेन. 

दरम्यान, घोड धरण भरलेले असले, तरी त्यातही रब्बीच्या आवर्तनाला उशीर केला. त्यामुळे "घोड'ला पाणी असूनही पिके जाणार, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. त्यामुळे पाण्याचा संघर्ष यंदाही सुरू राहिल. इतर समस्याही कमी नाहीत. तालुक्‍यातील गावांना जोडणारे रस्ते नावालाच आहेत. तेथे खड्डे जास्त असल्यामुळे अपघात वाढले, तर नगर-दौंड महामार्ग जास्त चांगला झाल्याने तेथे अपघात होत आहेत. 

लिंबाला दर नाही. शहरात पाच पट जास्त दर, मात्र व्यापाऱ्यांची एकी शेतकऱ्यांना लूटते. कांद्याला काही दिवस दर मिळतो, मात्र इतर वेळी तोच कांदा शेतात सडतो. त्यामुळे या सगळ्या समस्या वर्ष बदलल्यानंतरही कायम राहणार असल्याने श्रीगोंदेकरांसाठी फक्त कॅलेंडर बदलले, असेच म्हणण्याची वेळ येणार आहे. 

विसापूर'चे पाणी सोडा : काकडे 
विसापूर धरण भरले आहे. त्यातून आवर्तन सोडले, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. "कुकडी'चे आवर्तन आल्यावर पुन्हा "विसापूर' भरले, तर उन्हाळ्यात त्याचा उपयोग होईल. त्यामुळे किमान "विसापूर'मधून तरी लगेच पाणी सोडा, अशी मागणी शेतकरी बचाव कृतिसमितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The problem of water and roads in Shrigonda taluka has not been solved