चिंचेमुळे शेतकऱ्यांचे तोंड झाले “आंबट”

सुनील गर्जे
Friday, 25 December 2020

ग्रामीण भागात बांधावर आंबा, चिंच झाडांची लागवड केली जात होती. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते. त्यामुळे बांधावर, वस्त्यांभोवती चिंचेच्या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर, तर काहींनी फळबाग योजनांतर्गत ६० हेक्टरवर चिंचेची लागवड केलेली आहे. शेतकऱ्यांना वरदान ठरणारी चिंचेचे यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले आहे. त्यामुळे चिंचेला भाव मिळणार नसल्याने यावर्षी 'गोड चिंच' शेतकऱ्यांसाठी 'आंबट' ठरणार आहे असे दिसत आहे. 
 
ग्रामीण भागात बांधावर आंबा, चिंच झाडांची लागवड केली जात होती. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते. त्यामुळे बांधावर, वस्त्यांभोवती चिंचेच्या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. चिंचेपासून खाद्य पदार्थ, औषधे, चिंचोकापासून विविध पदार्थ बनवले जातात. त्याबरोबर स्वयंपाक घरात रोज चिंच, चिंचपाणी वापरतात. शासनाने फळबाग योजनेंतर्गत १९९५ पासून १०० टक्के अनुदान दिल्याने बांधावरील चिंच लागवड शेतकऱ्यांनी हेक्टरवर केली आहे. 

हे ही वाचा : नूतनीकरणाने पालटले रुपडे ; विद्यार्थ्यांअभावी न्यू इंग्लिश स्कूलचा परिसर सुनासुना

गतवर्षी अवकाळी पावसामुळे चिंचेला फुलोरा कमी प्रमाणात आल्याने फळधारणा कमी झाली. यामुळे उत्पादनात घट झाल्याने चिंचेला चांगला फायदा मिळाला होता. यंदा पावसाने जूनपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत १५ ते ३० दिवस अंतर ठेवल्याने चिंचेच्या झाडाला मोहर चांगला आला होता. आता चिंचा मोठ्या प्रमाणात लागल्याने उत्पादन वाढणार असल्याने दर कमी मिळणार असल्याने शेतकऱ्यांची चिंच आंबट होणार आहे.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
       
तालुक्याच्या ग्रामीण भागात २० वर्षांपूर्वी गावरान चिंचेची लागवड बांधावर व सावलीसाठी केली जात होती. मात्र बाजारपेठेत मागणी वाढल्यामुळे चिंचेचे वेगवेगळे वाण आले. त्यानंतर मागणीबरोबर उत्पादन वाढले. त्यामुळे शेतकरी फळबाग म्हणून चिंचेच्या लागवडीकडे वळला आहे. त्यातून काही वर्षांपासून चांगले उत्पन्नही मिळाले आहे. मात्र यंदा उत्पादन वाढल्याने दर घसरण्याची शक्यता चिंच उत्पादन शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

म्हणून दर कमी मिळणार !

गतवर्षी नेवासे तालुक्यासह सर्वत्रच अतिवृष्टी झाल्यामुळे चिंचेला मोहर लागला नव्हता. त्यामुळे उत्पादनात घट होऊन चिंचेला दर चांगला मिळाला होता. यावर्षी जून महिन्यापासून पाऊस पडत असला तरी अधूनमधून पावसाने उघडी दिल्याने चिंचेला मोहर चांगला आला. झाडाला मोठ्या प्रमाणात चिंचा लागल्या आहेत. उत्पादन वाढणार असल्याने दर कमी मिळणार  आहे.

"गतवर्षी उत्पादन घटले होते; त्यामुळे चिंचेला चांगला भाव मिळाला, आणखी चांगला दर मिळाला असता. मात्र, कोरोना पार्श्वभूमीमुळे हॉटेल, व्यापारी बाजारपेठ बंद होते. यावर्षी चिंचेच्या उत्पादनात वाढ झाल्याने दर कमी राहणार आहे.  
- ईश्वर कल्हापुरे, युवा शेतकरी, खडका फाटा, ता. नेवासे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The production of tamarind which is a boon to farmers has increased significantly this year