विखे पाटील म्हणतात, राहुल गांधी दुटप्पी, अधिकार नसतील तर सत्तेत राहता कशाला? 

radhakrushna vikhe criticize congress
radhakrushna vikhe criticize congress

नगर : ""सत्तेत सहभागी असलेल्या कॉंग्रेसची अवस्था "डबल ढोलकी सारखी' झाली आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहता कशाला? बाहेर पडण्याची हिंमत दाखवा. राज्यात निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच कॉंग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार आहेत,'' असा आरोप माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. 

कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना विखे पाटील म्हणाले, की राहुल गांधी यांचे विधान दुटप्पी आहे. सरकारमध्ये राहायचे आणि आम्हाला निर्णयाचे अधिकार नाही, असे जाहीरपणे सांगायचे; मग सरकारमध्ये तुम्ही थांबलातच कशाला? सरकारमधून तत्काळ बाहेर पडण्याची हिंमत दाखवा. एकीकडे सत्तेत राहायचे, सत्तेचा मलिदा चाखायचा आणि दुसरीकडे, निर्णयाचे अधिकार नाहीत म्हणून जबाबदारी झटकायची, असे दोन्ही बाजूने बोलायचे. असे कसे चालेल? 

सध्याच्या परिस्थितीला तिन्ही पक्ष जबाबदार

राज्यात एवढे मोठे संकट उभे आहे. मुंबईची अवस्था बिकट झाली आहे. देशातील 40 टक्‍के जनता एकट्या मुंबईत आहे. तेथील परिस्थितीला सत्तेत सहभागी तिन्ही पक्ष जबाबदार आहेत. राज्यातील प्रत्येक घटक या संकटामुळे अडचणीत असतानासुद्धा राहुल गांधी यावर कधी बोलले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या काही व्यक्‍तिगत अडचणी असतील. त्यामुळे ते "मातोश्री'बाहेर जाऊ शकत नाहीत; मात्र बाकीचे मंत्री मुंबईत का थांबले, याचे कोडे जनतेला उलगडलेले नाही, असेही विखे पाटील म्हणाले. 

फक्‍त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बैठकांचा फार्स 

राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. भावाअभावी शेतमालाची परवड झाली आहे. खरीप हंगाम समोर असताना नियोजन नाही. फक्‍त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बैठकांचा फार्स सुरू आहे. पालकमंत्रीसुद्धा औपचारिकता म्हणून जिल्ह्यात येऊन फक्‍त आढावा घेतात. ठोस निर्णय होत नसल्याने जनतेला या सरकारकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी केलेले विधान हे फक्‍त लोकांची दिशाभूल करणारे असून, निर्माण झालेल्या या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच कॉंग्रेसही जबाबदार आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला. 

उलट तुम्हीच श्‍वेतपत्रिका काढा

केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमांतून 28 हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदतीवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय दिले, याची श्‍वेतपत्रिका काढा, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com