१४ वर्षात पहिल्यांदाच मुळातून जायकवाडीला गेले १३ हजार दशलक्ष घनफूट पाणी

विलास कुलकर्णी
Saturday, 3 October 2020

मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. धरणातून मुळा नदीपात्रात दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. धरणातून मुळा नदीपात्रात दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. यंदा 'मुळा'तून जायकवाडी धरणात आजपर्यंत 13 हजार 426 दशलक्ष घनफूट पाणी गेले. मागील १४ वर्षांत (2006 नंतर) प्रथमच उच्चांकी पाणी जायकवाडीला गेले. 

मुळा धरणात 25 हजार 979 दशलक्ष घनफूटसाठा स्थिर ठेवून, नवीन येणारे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. मागीलवर्षी धरणात एकूण 37 हजार 876 दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. त्यापैकी 7032 दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला गेले. यंदा 34 हजार 483 दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. पैकी, नदीपात्रातून जायकवाडीला 13,426; उजव्या कालव्यातून 1758; डाव्या कालव्यातून 107 व वांबोरी योजनेतून 91 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्याची माहिती धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी दिली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
'मुळा' च्या लाभक्षेत्रात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढली आहे. विहिरी व कूपनलिका तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे, रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी राहणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी धरण भरल्याने लाभक्षेत्रातील पाण्याचा दुष्काळ हटला आहे. 15 ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने 26 हजार दशलक्ष घनफूट भरले जाईल. नंतर, धरणातील वर्षभराच्या पाणी वापराचे नियोजन होईल. थेट धरणातून पिण्याच्या पाणी योजना, औद्योगिक वापराचे पाणी, बाष्पीभवन, अचल साठा वगळता सिंचनासाठी 14 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होईल.‌

यंदा रब्बी हंगामात दोन व उन्हाळी हंगामात दोन असे सिंचनाचे चार आवर्तने अपेक्षित आहेत. एक नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी, 15 मार्च ते 30 एप्रिल व 15 मे ते 15 जून दरम्यान धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून सिंचनाची आवर्तने अपेक्षित आहेत. सलग दुसऱ्या वर्षी धरण भरल्याने लाभक्षेत्रातील पाण्याचा दुष्काळ हटला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in Mula Dam reduces water flow