esakal | जामखेडमध्ये चिठ्ठीचाही कौल राष्ट्रवादीला, सभापतीपदी राजश्री मोरे
sakal

बोलून बातमी शोधा

Rajshri More as Speaker in Jamkhed

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी तथा पिठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सभागृहात सभापती निवडीचा कार्यक्रम झाला.  

जामखेडमध्ये चिठ्ठीचाही कौल राष्ट्रवादीला, सभापतीपदी राजश्री मोरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामखेड : नगर जिल्ह्यात कर्जत आणि जामखेड तालुक्यातील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागलेले असते. आमदार रोहित पवार यांच्या राजकीय खेळीमुळे प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी ही भाजपला धोबीपछाड देत आहे. सर्वात गाजली ती पंचायत समितीच्या सभापतीची निवड.

आठ महिन्यांपासून नियमात अडकलेल्या जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया शेवटी चिठ्ठीद्वारे आज झाली. यातही राष्ट्रवादीनेच बाजी मारली. राजश्री मोरे यांना हा मान मिळाला.

नगरपालिकेच्या पाठोपाठ जामखेड पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला. आमदार रोहित पवार यांच्या हाती या संस्थेचीही सत्ता आली. तसेच रत्नापूर (ता. जामखेड) या गावाला तिसऱ्यांदा सभापतीपदाचा मान मिळाला आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे हे पंचायत समितीचे, तर नंदा वारे या महिला बालकल्याण समितीच्या सभापती राहिल्या आहेत. जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीचे राजकारण संपूर्ण जिल्हाभर गाजले. भाजपचे चार सदस्य असणाऱ्या या संस्थेतील दोघांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधल्याने दोन्ही बाजुला समसमान मते होते.

आरक्षणाला हरकत घेतल्याने सभापती निवडीची चिठ्ठी काढली नव्हती. अखेर न्यायालयाने निवडीची चिठ्ठी काढण्याचे निर्देश दिल्याने आज निवडीची चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये राजश्री सूर्यकांत मोरे आणि मनिषा रविंद्र सुरवसे या दोघींच्या चिठ्ठ्या होत्या. यापैकी राजश्री मोरे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांचे सभापती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 

अशी प्रक्रिया पार पडली

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी तथा पिठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सभागृहात सभापती निवडीचा कार्यक्रम झाला.  
ता. 3 जुलै 2020 रोजी झालेल्या मतदानात भाजपाच्या मनिषा सुरवसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री सुर्यकांत मोरे यांना समान मते पडली होती. आठ महिने देव पाण्यात ठेऊन सूर्यकांत मोरे यांनी सभापतीपद मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आणि राजश्री सुर्यकांत मोरे जामखेड पंचायत समितीच्या सभापती झाल्या.

सूर्यकांत मोरे ठरले हिरो..!

विधानसभा निवडणुकीत सूर्यकांत मोरे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांची साथ सोडून रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून मोरे हे कर्जत- जामखेड चा राजकीय पटलावर अधिक ठळकपणे चर्चेत आले. निवडणुकीच्या प्रचारातील त्यांची भाषणे खूप गाजली. पुढे रोहित पवार आमदार झाले आणि पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रीया जाहीर झाली. सभापतीच्या आरक्षणाची सोडत निघाली, तेव्हापासून हरकतीचा मुद्दा पुढे आल्याने सभापतीपदाची निवड लांबली होती. अखेर औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निवड झाली आणि मोरे यांच्या पत्नी राजश्री मोरे यांची सभापतीपदी निवड झाली.

संपादन - अशोक निंबाळकर