शरद पवारांना भाऊराया मानून पाठवल्या राख्या...मागितली ही ओवाळणी

राजेंद्र सावंत
Tuesday, 4 August 2020

शिक्षिकांनी टपालाने ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री मुश्रीफ व आमदार पवार यांना राख्या पाठविल्या.

पाथर्डी : राज्यातील शिक्षिकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार यांना टपालाने राख्या पाठविल्या आहेत. विनाअट, विनाविलंब शिक्षक पती-पत्नींचे एकत्रीकरण करावे, असे साकडे घातले आहे. राज्यातील पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीच्या प्राथमिक शिक्षिकांनी अनोख्या पद्धतीने केलेल्या या मागणीची चर्चा आहे. 

शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीने महिनाभरापासून घरी राहून सोशल मीडियाद्वारे आंदोलन सुरू केले आहे. आमदार रोहित पवार यांनी याबाबत धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व शिक्षक प्रतिनिधींची भेट घडवून आणली.

हेही वाचा - शेतकऱ्यांना मिळणार दीड लाखांचे कर्ज

दरम्यान, रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राज्यातील शिक्षिकांनी टपालाने ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री मुश्रीफ व आमदार पवार यांना राख्या पाठविल्या. सोबत "बहिणी'ची बदली करून (पती-पत्नी एकत्रीकरण करून) रक्षाबंधनाची ओवाळणीची मागणी केली. 

साधना लवटे, रंजना खाडे, मनीषा अडसुरे, अनिता जाधव, सोनाली कुलकर्णी, ललिता बानगुडे, मनीषा कड, वर्षा राठोड, शीतल वाघमारे, मीना गुंजकर, भारती कोल्हे, हर्षा बुटे, माधुरी मनगिरे, शोभा शिरसाट, अनुराधा माडेकर आदींसह सुमारे अडीचशे शिक्षिकांनी अशा पद्धतीने राख्या पाठविल्या. 

 

राज्यातील शिक्षिकांच्या बदल्या करून पती-पत्नींचे एकत्रीकरण करावे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या शिक्षक दाम्पत्यांच्या मुलांच्या संस्काराचा व शिक्षकांच्या मानसिक स्थितीचा प्रश्न गंभीर आहे. काहींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. काही कुटुंबांत वाद वाढून संसार मोडकळीस आले आहेत. आता बदल्या केल्यास हीच ओवाळणी समजू. 
- मनीषा कड, महिला अध्यक्ष, राज्य पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समिती. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakhya sent by teachers to Sharad Pawar