esakal | राळेगण सिद्धीप्रमाणे प्रत्येक गावात पाणलोटक्षेत्राची कामे होणे ही काळाची गरज : अण्णा हजारे
sakal

बोलून बातमी शोधा

As per Ralegan Siddhi watershed works are required in every village

राळेगण सिद्धीतील पाणलोट क्षेत्रातील काम हे माथा ते पायथा झाल्याने मातीचे प्रदूषण पुर्णतः थांबले आहे.

राळेगण सिद्धीप्रमाणे प्रत्येक गावात पाणलोटक्षेत्राची कामे होणे ही काळाची गरज : अण्णा हजारे

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगण सिद्धी (अहमदनगर) : राळेगण सिद्धीतील पाणलोट क्षेत्रातील काम हे माथा ते पायथा झाल्याने मातीचे प्रदूषण पुर्णतः थांबले आहे. सर्व बंधाऱ्यात वाहून आलेले पाणी पूर्णपणे स्वच्छ व नितळ आहे. प्रत्येक गावागावामध्ये असे प्रयोग होणे काळाची गरज आहे, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
 

राळेगणसिद्धीतील बंधाऱ्यांची हजारे यांनी यांनी पाहणी केली. हजारे म्हणाले, राळेगणसिद्धीत पाणलोट क्षेत्रातील काम हे माथा ते पायथा झाले असून त्यात डीप सीसीटी, नालाबांध, चेकडॅम, ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण अशी कामे झाल्यामुळे राळेगणमधील पाण्याचा प्रश्न तसेच मातीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात थांबले आहे.
 

कोरोना महामारीचा शिरकाव राळेगणसिद्धीत झाला असला तरी दरवर्षीप्रमाणे बंधाऱ्यातील पाणी साठ्याची पाहणी करण्याचा पायंडा हजारे यांनी कायम ठेवला. विशेषतः गतवर्षी हजारे यांच्या संकल्पनेतून राळेगणसिद्धीतील १२ नालाबांध बंधारे व एक पाझर तलावांच्या बंधाऱ्यांच्या भिंतीला प्लॅस्टिक कागद अस्तरीकरणाचा नाविन्यपुर्ण प्रयोग राबविला होता. बंधाऱ्यातून होणाऱ्या पाणीगळतीवर तो नामी व खात्रीलायक असा कमी खर्चातील उपाय ठरला होता. या वर्षीच्या उन्हाळ्यात उरलेल्या काही बंधाऱ्यांवर हा उपक्रम करण्यात आला होता.
 

गावात आल्यानंतर प्रथमतः त्यांनी एक गाव एक गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर संत यादवबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी माजी उपसरपंच लाभेष औटी, उद्योजक भगवान पठारे, सुरेश पठारे, दत्ता आवारी, अरुण पठारे, दादा गाजरे, शाम पठाडे आदी त्यांच्या समवेत उपस्थित होते. यावेळी हजारे यांनी स्मशानभुमीत सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली. तेथे लावलेल्या झाडांची पाहणी केली. त्यानंतर गावातील कोहिनी व पठारदरा भागात शिवार फेरी केली.

डोंगरमाथ्यावर माती तयार होण्यासाठी तब्बल १०० वर्षापेक्षा अधिक काळ लागतो. पाऊस मोठ्या प्रमाणात झाले. तर ही सर्व माती पुराच्या पाण्यातून समुद्रात व धरणात वाहून जाते. ती थांबविण्यासाठी माथा ते पायथा असे पथदर्शक पाणलोट क्षेत्र विकासाचे काम गावोगावी होणे काळाची गरज आहे. हे काम राळेगणसिद्धीत झाल्याने मातीचे प्रदुषण पुर्णतः थांबले आहे. 
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक  

संपादन : अशोक मुरुमकर