राळेगण सिद्धीच्या तरूणाईला लागलंय सायकलचं याड

एकनाथ भालेकर
Thursday, 12 November 2020

राळेगणसिद्धीतील युवकांत सायकल चालवण्याची क्रेज वाढताना दिसून येत आहे.

राळेगणसिद्धी : लहानपणी अनेक जण सायकल चालवितात. परंतु वाढत्या वयात सायकलकडे दुर्लक्ष होते. कोरोनाचा अनिश्चित काळ व सध्याच्या धकाधकीच्या जीवनात चांगले आरोग्य ठेवणे, हे मोठे आव्हान आहे.

राळेगणसिद्धीतील युवकांत सायकल चालवण्याची क्रेज वाढताना दिसून येत आहे. राळेगण सिद्धीतील प्राथमिक शिक्षक सुनील मापारी यांनी नुकताच पुणे ते राळेगणसिद्धी असा प्रवास सायकलवर करीत 76 किलोमीटरचे अंतर सुमारे सव्वा चार तासात पूर्ण केले. तर पत्रकार एकनाथ भालेकर यांनी बालेवाडी स्टेडिअम (पुणे) ते राळेगणसिद्धी हे सुमारे 100 किलोमीटर अंतर पाच तासात पूर्ण केले होते.

लवकरच राळेगणसिद्धी ते कोल्हापूर हा दौरा सायकलवरून करणार असल्याचे सुनील मापारी व एकनाथ भालेकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले. सतीश मापारी यांनी आजपर्यंत अनेकदा पिंपरी चिंचवड ते लोणावळा तसेच पुणे ते राळेगणसिद्धी अशी सायकल सफर केली आहे. 

या आधी राळेगणसिद्धीतील उद्योजक भागवत पठारे यांनी काही पुण्यातील सहका-यांसोबत कंबोडिया, व्हियतनाम, थायलंड या देशांचा दौरा सायकलवरून केला होता. त्यांनी आजपर्यंत पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते गोवा, मनाली ते खारदुंगला या अत्यंत अवघड अशा ठिकाणचे दौरे सायकल वरून केले आहेत.

सायकल चालविण्यासाठी पठारे यांची प्रेरणा गावातील युवकांना मिळाली आहे. गावातही अनेक शेतकरी त्यांचे शेतातील दैनंदिन कामे करण्यासाठी सायकलचाच वापर करताना दिसतात. दूध घालण्यासाठी, जनावरांना चारा आणण्यासाठी, दुकानातून वस्तू आणण्यासाठी आदी कामांसाठी दुचाकी वाहने टाळून सायकलचा वापर करताना अनेक शेतक-यांकडून केला जात आहे. 

 

सायकल चालविणे प्रदुषणमुक्त व पर्यावरण पूरक आहे. इंधनाची बचत व वाहतूक कोंडीतून आपली सुटका होते. सायकलिंग केल्याने आपल्याला इतर वेगळा व्यायाम करण्याची गरज भासत नाही. शरीर तंदुरुस्त राहते तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढते. रात्री चांगली झोप लागते. आपल्याला वजन आटोक्यात ठेवणे शक्य होते. नियमित सायकल चालविल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते तसेच हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. 
- भागवत पठारे - उद्योजक ,राळेगणसिद्धी
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ralegan Siddhi's youth is addicted to bicycles ahmednagar news