esakal | फुलांची आवक घटली; लॉकडाउन, अतिवृष्टीचा परिणाम 
sakal

बोलून बातमी शोधा

Rates are likely to increase due to reduced flowering due to rains

यंदाचे वर्ष व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही कठीण जात आहे. लॉकडाउनमध्ये व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागला.

फुलांची आवक घटली; लॉकडाउन, अतिवृष्टीचा परिणाम 

sakal_logo
By
दत्ता इंगळे

नगर (अहमदनगर) : यंदाचे वर्ष व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही कठीण जात आहे. लॉकडाउनमध्ये व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागला. आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर संकट आणले. त्यात धार्मिक स्थळे बंद असल्याचा तोटा फूल व्यवसायाला बसला. अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठेत फुलांची आवक निम्म्याने घटली असून, दर चांगलेच वाढले आहेत. 

जिल्ह्यात सरासरी 448 मिलिमीटर पाऊस पडतो; पण या वर्षी 767 मिलिमीटर (सरासरीच्या 171 टक्‍के) झाला. हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात दसरा व दिवाळीपूर्वी बाजारात फुले विक्रीसाठी येतात. यंदा नवरात्रात व त्यापूर्वी दमदार पाऊस झाल्याने फुलांची मोठी नासाडी झाली. काढणीला आलेली फुले ओली झाल्याने खराब होत आहेत. त्याचा परिणाम आवक व दरावर झाला आहे. 

दसरा सणापूर्वी दोन दिवस शहरातील मार्केट यार्डमधील अडतीवर फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे अनेकांच्या हातातून पीक निघून गेल्याने आवक घटली आहे. चांगल्या फुलांचे दर वाढले आहेत. खराब फुलेही निम्म्यापेक्षा कमी दराने विकली जात आहेत. पाऊस व आर्द्रतेमुळे ही फुले लवकर खराब होण्याचा धोका संभवतो. 

फुलांचे दर (किलोप्रमाणे) 
झेंडू- 70 ते 100 
शेवंती-150 ते 250 
ऍस्टर 200 ते 300 
गुलछडी 400 ते 500 
गुलाब 200 ते 300 
लिली गड्डी 20 ते 25 
गुलाब गड्डी 20 ते 30 

परराज्यांतील व्यापाऱ्यांची पाठ 
दसरा व दिवाळी सणासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात येथील व्यापारी येथून मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करतात. मात्र, यंदा तेही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून माल घेण्याचे टाळत आहेत. 

अतिवृष्टीमुळे यंदा आवक निम्म्याने कमी झाली. दसरा सणात फुले कमी आली आहेत. त्यातच पावसामुळे ओली झालेली फुले खराब होण्याचा धोका आहे. 
- अजय तिवारी, फुलांचे ठोक व्यापारी 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image