भुयारी गटारांवर अतिक्रमणांचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

औरंगाबाद रस्त्यावरील लष्करी हद्दीत उगम पावणाऱ्या नाल्यावर राज्य शासनाच्या विविध विभागांनी अतिक्रमणे करत वसाहती थाटल्या आहेत. शासनच अतिक्रमण करत असल्याने लोकांचेही फावले. लोकांनी महापालिकेच्या मदतीने हा नालाच काही ठिकाणी "हायजॅक' करत त्याला भुयारी गटारांतून सीना नदीत धाडले आहे.

नगर : औरंगाबाद रस्त्यावरील लष्करी हद्दीत उगम पावणाऱ्या नाल्यावर राज्य शासनाच्या विविध विभागांनी अतिक्रमणे करत वसाहती थाटल्या आहेत. शासनच अतिक्रमण करत असल्याने लोकांचेही फावले. लोकांनी महापालिकेच्या मदतीने हा नालाच काही ठिकाणी "हायजॅक' करत त्याला भुयारी गटारांतून सीना नदीत धाडले आहे. या भुयारी गटारांवर अतिक्रमणांचे साम्राज्यच निर्माण झाले आहे. या नाल्याला स्वच्छ करून त्यालगत उद्यान तयार करण्यास तत्कालीन व आताच्या पर्यावरणमंत्र्यांनी महापालिकेला सांगितले होते; मात्र महापालिका प्रशासनाने या सूचनेलाच कचऱ्याची टोपली दाखविली आहे. 

नगर-औरंगाबाद रस्त्यापासून नीलक्रांती चौकापर्यंत वाहणाऱ्या नाल्यावर शासकीय खात्यांनीच अतिक्रमणे केली आहेत. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने जागोजागी नाल्याचा नैसर्गिक प्रवाहच दाबण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेने दोन ठिकाणी या विस्तीर्ण नाल्याला बंद गटाराचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. रामवाडी झोपडपट्टीत या बंद नाल्यावर महापालिकेने सार्वजनिक शौचालय उभारले आहे. पोलिस वसाहतीत या नाल्यावर सांस्कृतिक भवन आहे. राज्य शासनच या नाल्यावर अतिक्रमण करत असल्याने नागरिकांनाही बळ मिळाले आहे. 

अवश्‍य वाचा - महापालिकेची पुन्हा चूल पेटली!

लष्करी हद्दीत उगम पावणारा नाला नगर-औरंगाबाद रस्ता ओलांडून महापालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळून निघतो. याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूलसह विविध शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत उभारली आहे. या वसाहतीतील एक इमारतच सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्यावर बांधली आहे. त्यामुळे या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला. त्यासाठी नाल्यावर भराव व भिंत टाकण्यात आली आहे. हा नाला आरटीओ कार्यालयमार्गे निघताच त्याचे स्वरूप हळूहळू विस्तृत होते. 

राधाबाई काळे महिला महाविद्यालयापर्यंत येताच हा नाला विस्तृत होतो. याच ठिकाणी दीड वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन पर्यटन व पर्यावरणमंत्री रामदास कदम व सध्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली होती. या नाल्याची स्वच्छता करून परिसरात उद्यान करण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली होती. आजपर्यंत उद्यान तर दूरच, या नाल्याची संपूर्ण स्वच्छताही झाली नाही. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तसेच आहे. 

महिला महाविद्यालयाच्या भिंतीपासून हा नाला अचानक गायब होतो. तो सापडत नाही. या नाल्यावर काही महाशयांनी भूखंड तयार करून संरक्षक भिंतीही बांधल्या आहेत. हा गायब झालेला नाला बंद गटाराच्या स्वरूपात जमिनीखालून वाहतो. त्यामुळे या भागात पूर येण्याचा मोठा धोका आहे. कराचीवालानगर, रामवाडी भागात या बंद गटारावर अनेकांनी अतिक्रमणे करून घरे बांधली आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने या नाल्यावर सार्वजनिक शौचालय बांधून कळसच केला आहे. नाल्याला मिळालेली ही बंद गटाराची शिक्षा लाल टाकी कब्रस्तानाजवळ संपते. तेथे पुन्हा खुला झालेला हा नाला सर्जेपुरा रस्त्यावरील पुलाखालून जाताच भिंतींचे बांध घालत अतिक्रमणे करण्यात आली आहेत. 

देशमुखवाडी जिल्हा परिषद अधिकारी वसाहतीमधील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ हा नाला भिंत घालून अरुंद करण्यात आला आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत या नाल्याला कॅनॉलचे स्वरूप देण्यात आले आहे. या नाल्याची महापालिकेकडून सफाई झालेली नाही. पोलिस वसाहतीत येताच या नाल्याला पोलिसी खाक्‍या दाखविला जातो. कॅनॉल झालेल्या नाल्याला खुल्या गटाराचे स्वरूप देण्यात आले आहे. या नाल्याच्या पात्रातच पोलिसांनी सांस्कृतिक लॉन व सभागृह उभारले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याला पूर येऊन पोलिस वसाहतीतील घरांमध्ये पाणी शिरते. 

पोलिस वसाहतीतून निघालेल्या या नाल्याला महापालिकेकडून पुन्हा बंद गटाराचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे. या बंद गटाराच्या अतिक्रमणांवर व्यावसायिक गाळे, संकुले, इमारती उभ्या राहिल्या आहेत. येथे कधी नालाही होता, हे नागरिकांना कळणारही नाही अशी स्थिती महापालिका अधिकाऱ्यांनी तयार केली आहे. मात्र, पावसाच्या पाण्याला हे माहीत नसल्याने ते नैसर्गिकरीत्या वाहते. त्यामुळे न्यू आर्टस कॉलेज ते नीलक्रांती चौकादरम्यान प्रत्येक पावसानंतर पाणी साचते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The realm of encroachments on underground sewers