कोरोना योद्ध्यांच्या नातेवाईकांना मिळेना आर्थिक मदत

अमित आवारी
Tuesday, 13 October 2020

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या सुरक्षा कवच विमा योजनेतून 50 लाखांची मदत देण्याचा ठराव महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी केला. या ठरावासाठी महापालिका कामगार संघटनेने प्रयत्न केले.

नगर ः कोरोना संकटात महापालिका कर्मचाऱ्यांनी अहोरात्र नागरिकांना सहकार्य केले. यात महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांच्या वारसांना सुरक्षा कवच विमा योजनेतून 50 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासकीय लालफितीच्या कारभारात मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची मदत अडकली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या सुरक्षा कवच विमा योजनेतून 50 लाखांची मदत देण्याचा ठराव महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी केला. या ठरावासाठी महापालिका कामगार संघटनेने प्रयत्न केले.

महापालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच विमा योजनेचा लाभ मिळवून देणारी नगर महापालिका राज्यात तिसरी ठरली. यापूर्वी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केली होती. 
महापालिकेच्या शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील तिघांचा मृत्यू झाला. त्यास आता दोन महिने होत आले असताना, महापालिका प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी, यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेला नाही.

मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेने दोन वेळा पत्र पाठवून वारस प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. मात्र, तहसील कार्यालयाकडून हे प्रमाणपत्र मिळत नव्हते. अखेर काल (ता.12) तहसील कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना वारस प्रमाणपत्र मिळाले.

हे प्रमाणपत्र आज महापालिकेत सादर करण्यात आले. हे प्रमाणपत्र जोडून महापालिका आता सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहे. नगरविकास, आरोग्य व वित्त विभागाकडून हा निधी येईल. 

महापालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी कामगार कल्याण निधीतूनही 20 लाखांचा निधी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने सहकार्य करून मृतांच्या नातेवाईकांना लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. 
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, कामगार संघटना 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relatives of employees who died due to corona did not get help