अकोल्यात कामगार संघटनांच्या आंदोलनाला प्रतिसाद

शांताराम काळे
Thursday, 26 November 2020

केंद्र व राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली; परंतु प्रत्येक वेळी शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले.

अकोले : देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या आजच्या संपाला अकोले तालुका माध्यमिक शिक्षक संघ व डी.एड. पदवीधर कला, क्रीडा शिक्षक- शिक्षकेतर संघाने सहभाग घेऊन पाठिंबा दिला. माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे अकोल्यातील तहसीलदारांना निवेदन दिले. 

शिक्षक- शिक्षकेतर, तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित विद्यालयांना तातडीने शंभर टक्के अनुदान द्यावे, दहा, वीस, तीस वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, यांसह विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आज (गुरुवारी) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. सन 2005नंतर नियुक्त सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू नाही. 

केंद्र व राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली; परंतु प्रत्येक वेळी शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले. यामुळे शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नायब तहसीलदार महाले यांना निवेदन देण्यात आले. पंडित नेहे, भास्कर कानवडे, प्रकाश आरोटे, रमेश बेनके, सतीश काळे, डी. आर. गायकवाड उपस्थित होते. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response to trade union movement in Akola