
राज्यात महाविकास आघाडीची यशस्वी घोडदौड सुरु असून स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीनी कॉंग्रेसला योग्य तो सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार करू अन्यथा स्वबळावर लढण्याची संपूर्ण ताकद ठेवा.
कोपरगाव (अहमदनगर) : राज्यात महाविकास आघाडीची यशस्वी घोडदौड सुरु असून स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीनी कॉंग्रेसला योग्य तो सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार करू अन्यथा स्वबळावर लढण्याची संपूर्ण ताकद ठेवा, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोपरगाव तालुका व शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावर्षी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, संगमनेर नगराध्यक्ष दुर्गा तांबे, अनुराधा नागवडे यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय आढावा बैठक संगमनेर येथे घेतली. कोपरगाव तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणूक रणनीती, पदाधिकारी विस्तार, वर्षभरातील कार्यक्रम इतर अनेक बाबींवर या बैठकीत चर्चा झाली.
जिल्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक खांबेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी मनोगत व्यक्त केले. आगामी काळात पक्षाची ताकद तसेच संघटन जोमाने वाढवण्यावर भर देऊन युवक व ज्येष्ठ नेत्यांचा मेळ घालून पक्ष मार्गक्रमण करेल. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीजय चांदगुडे, युवक कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते, शहराध्यक्ष सुनील साळुंके, अक्षय आंग्रे, गिरिष अकोलकर, महिला तालुकाध्यक्ष ऍड. शीतल देशमुख, महिला शहराध्यक्ष रेखा जगताप उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर