अजबच! शिर्डीत कुत्री धरून आणणाऱ्यास बक्षीस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

एका सर्वेक्षणानुसार, दर वर्षी शिर्डी व परिसरात एक हजारांहून अधिक जणांना श्वानदंश होतो.

शिर्डी ः शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने भाविक व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर कोते यांनी मोकाट कुत्र्यांची पाच पिले नगरपंचायत कार्यालयात आणून ठेवत, या समस्येकडे प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. शहरवासीयांनी मोकाट जनावरे व कुत्री पंचायत कार्यालयात आणून सोडल्यास त्यांना रोख बक्षिसे देण्याचे त्यांनी जाहीर केले. 

शहरात हॉटेल्स, उपाहारगृहे व खाद्यपदार्थांच्या गाड्यांची रेलचेल आहे. त्यामुळे शिळे अन्न मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. बरेच भाविक मोकाट कुत्र्यांना श्रद्घेपोटी खाऊ घालतात. शहराच्या दोन्ही बाजूंना दूरपर्यंत ढाबे आहेत. खाद्यान्न सहजासहजी उपलब्ध झाल्याने, येथे मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या स्थायिक झाल्या आहेत. त्यातील बरीचशी मोकाट कुत्री पायी येणाऱ्या पालख्यांसोबत येथे येतात. भाविक वाहनांतून घरी गेल्यावर सोबत आलेली कुत्री येथेच राहतात. 

हेही वाचा - पुन्हा लॉकडाउन लागण्याच्या भीतीने आत्महत्या

एका सर्वेक्षणानुसार, दर वर्षी शिर्डी व परिसरात एक हजारांहून अधिक जणांना श्वानदंश होतो. या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्यांत भांडणे सुरू झाली, की रहिवासी व भाविकांना रस्ता बदलण्याशिवाय पर्याय राहत नाही. शाळकरी मुले घाबरून जातात. दुचाकीस्वारांचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघात होतात. नगरपंचायतीने मध्यंतरी ही कुत्री पकडून दूर सोडण्याची मोहीम राबविली. मात्र, त्या-त्या भागातील रहिवासी त्यास विरोध करतात. शिवाय, त्यात कायदेविषयक अडचणी येतात.

या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम शिर्डी पंचायत व राहाता पालिकेने संयुक्तपणे राबवायला हवी किंवा साईसंस्थानचे सहकार्य घेऊन त्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reward for bringing a dog to Shirdi