सततच्या पावसाने शेवगावमधील रस्ते गेले पाण्याखाली

सचिन सातपुते 
Wednesday, 23 September 2020

सततच्या पावसाने शहरातील माऊलीनगर भागातील रस्ते अक्षरशः पाण्यात बुडाले आहेत.

शेवगाव (अहमदनगर) : सततच्या पावसाने शहरातील माऊलीनगर भागातील रस्ते अक्षरशः पाण्यात बुडाले आहेत. पाणी व चिखलमय रस्त्यांतून वाहने घालतांना मोठी कसरत करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.

शेवगाव- मिरी रस्त्यालगत शहरातील इरिगेशन कॉलनी शेजारी माऊलीनगर वसाहत आहे. 10 ते 12 वर्षांपासून या भागात अदयापही पक्के रस्ते झालेले नाहीत. येथील रस्ते माती- मुरूमांचे असल्याने पावसाळ्यात हे रस्ते अत्यंत चिखलमय, निसरडे होऊन जातात. संततधार पाऊस सुरू असल्यानंतर तर दुचाकी किंवा अन्य वाहनांनी प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरूनच करावा लागतो. सध्या कोरोनामुळे लोक घरातच असले तरी भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू तसेच नोकरी, शासकीय  व खाजगी कामांसाठी नागरीकांना घराबाहेर पडावेच लागते. अशा वेळी नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचा दैनंदिन अनुभव येतो.

विदयानगर व अन्य परिसरातील सांडपाणी इरिगेशन कॉलनीजवळ सोडण्यात आले आहे. ते पाणी माऊलीनगरच्या शेजारी असलेल्या मिरी रस्त्यालगत साठते. त्यातून डास, मच्छर यांची उत्पत्ती होवून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंग्यू, मलेरिया वा अन्य आजारांची साथ वाढण्याचा धोका तयार झाला आहे.

विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्ववरून हे सांडपाणी जात असल्याचे नागरिकांचे म्हणने असून त्यातून पिण्याचे पाणी दुषित होऊन कॉलरा, गॅस्ट्रो असे आजार वाढण्याचा धोका संभावतो.

विदयानगरमधून येणारे व साठून राहणारे सांडपाणी माऊलीगर परिसरातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या नळ्या टाकाव्यात, माऊलीगनर भागातही गटारी व सांडपाणी वहनाची व्यवस्था करावी, महावितरणशी संपर्क साधून ठिकठिकाणी पोल टाकावेत व दिवाबत्तीची सोय करावी, अशा मागण्या नागरिकांनी नगरपरिषदेकडे केल्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads in Shevgaon were flooded due to continuous rains