रोहित पवार-सुजय विखे पाटलांचं जामखेडमध्ये ठरलंय, राम शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का

Rohit Pawar-Sujay Vikhe Patil's alliance in Jamkhed
Rohit Pawar-Sujay Vikhe Patil's alliance in Jamkhed

जामखेड : माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक जगन्नाथ राळेभात यांच्या घरात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे संचालकपद येत आहे. विखेसमर्थक असलेल्या राळेभात यांचा बिनविरोध संचालकपदाचा मार्ग राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळे सुकर झाला आहे.

विखे-पवारांच्या ऐनवेळी धावलेल्या छुप्या सहमती एक्सप्रेसमुळे  माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटला गेले आहेत. राळेभात यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राम शिंदे त्यांच्यासोबत होते. नंतरच्या टप्प्यात ते मागे पडले आणि 'बिनविरोध' निकालाचा चेंडू आमदार पवार यांनी स्वतःच्या कोर्टातून टोलवला. त्यामुळे या निकालाने एकाकी पडलेल्या विखेंना पवारांच्या मदतीने लाभच झाला. दुसरीकडे शिंदे यांची राजकीय कोंडीच झाली.

जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांनी व त्यांचे पूत्र अमोल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरविले. भोसलेंच्या उमेदवारीने निवडणुकीतील उत्कंठता वाढली.

सुरुवातीला राळेभात पिता-पुत्रांपैकी एकाच अर्ज राहून बिनविरोध निवडणूक होईल, असे चित्र निर्माण झाले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता राळेभात यांचे पुत्र तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी आमदार रोहित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश भोसले यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली. त्यानंतर सुत्रे हलली. गटाचे राळेभात पिता-पुत्रापैकी एकाचा बँकेत बिनविरोध संचालक म्हणून जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

रोहित पवार यांची साखरपेरणी

आमदार रोहित पवारांनी सहकाराच्या राजकारणातील साखर पेरणी तालुक्यात केली आहे! या निवडणुकीमध्ये राळेभात पिता-पुत्रापैकी एकाला बिनविरोध संचालक म्हणून बँकेत पाठवताना आमदार रोहित पवार यांनी आपल्या मर्जीशिवाय मतदारसंघात कोणतेच महत्त्वाचे राजकीय निर्णय होणार नाहीत, यावरच जणू काही शिक्कामोर्तबच केले. आगामी निवडणुकांसाठी हे बेरजेचे राजकारण आहे. हे माजी मंत्री राम शिंदे यांच्या राजकीय वर्तुळाला धक्का लावणारी घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com